अनभिज्ञ


याच गावात होते मी जेव्हा याच गावात
काय चालू आहे अजून हे मला माहीत नव्हतं
मी अनभिज्ञ होते
माझ्या वस्तीत घडत असलेल्या एका
घटनेपासून पूर्णत:
माझ्या इमारतीत घडले काही हे
समजले मला पोलीस आल्यावर
समोरच्या घराला आग लागली
समोरच्या घरात आत्महत्या झाली
समोरच्या घरातला कर्ता अपघातात मेला
समोरच्या घरातल्या बाळीवर बलात्कार झाला
समोरच्या घरातलं प्रेत बायकोने ओळखलं अंगठीवरून
की त्याचं मस्तक उडून गेलंय बॉम्बस्फोटात
सापडलं तीन दिवसांनी तेही एका विजेच्या खांबावर
समोरच्या घरातला नवरा आपटतोय बायकोचं डोकं भिंतीवर
समोरच्या घरातल्या मुलीला पहिली पाळी आलीय
आई घरात नसताना
समोरच्या घरातला फोन डेड झालाय
समोरच्या घरातली वीज कापलीय बिल न भरल्यानं
समोरच्या घरातल्या विधवेकडे आलाय तिचा यार
आणि तिची लेकरं बसलीयेत पायरीवर पेंगुळत
समोरच्या घरातल्या लोकांचं आडनावच
आठवत नाहीये मला
समोरच्या घरात किती माणसं राहतात हेही नाही
आठवत
समोरचं घर समोरचं आहे
की डावीकडचं की उजवीकडचं
की वरचं वा खालचं वा मागचं नाहीये आठवत
समोरचं घर माझंच असेल कदाचित कोण जाणे
कोणत्याही गावातलं राज्यातलं देशातलं
कोणत्याही भाषेतलं असेल समोरचं घर कदाचित माझंही
याच घरात आहे मी तेव्हा याच खोलीत
काय चालू आहे आत्ता हे मला माहीत नाही
इतक्या शेकडोहजारोलाखोकरोडो भितींचे पातळ पापुद्रे
आहेत इथं अनभिज्ञ

कदंब – अंबर पांडे


कबऱ्या शब्दांनी बनलेल्या वाक्याचा एकच रंग
असतो जसा कदंबाच्या सगळ्या फुलांचा असतो
एकच रंग. ती होतात प्रकट वृक्षांवर जसा
उमलतो अर्थ शब्दांचा मेंदूत.
विंगेत अभिनेत्रींचा घोळका सजून उभा असावा
मंचावर होईल दाखल इतक्यातच तो
तशी देठांनी मेघगर्जना ऐकल्यागत आकस्मिक
फुलतात एकाएकी फुलं. क्लिष्ट, दाट
बाणभट्टाच्या कादंबरीसारखं यांचं स्वरूप
असतं. तर्कज्ञांनी या फुलांखाली असणाऱ्या अंधारावर
केल्याहेत चर्चा अनेक युगं.
याचं फळ असतं लालचुटुक सूर्यास्तासारखं
काळं पडून टपकतं तेव्हा दगडासारखं
बनतं टणक. तरुणांच्या कानशीलांवर नेम धरून
मारतात पोरी.
कदंबाच्या फळांनी आजवर मी मारच
खाल्ला आहे. फळ कधी नाही खाल्लं.
चवीविषयीची चर्चा पुन्हा कधी, कुठेतरी
करीन राव!
————
अंबर पांडे यांनी १०० झाडांविषयी कविता लिहिण्याचा मानस केला होता; त्यातल्या काही लिहून झाल्याहेत. मी त्यांच्या कवितांचे अनुवाद करतेय. सहज आणि अकारण. जे कवी कवितेला कारण, हेतू चिकटवून लिहितात वा अनुवाद करतात; त्यांच्या कविता कृतक असतात. असो. तर अंबरच्या या कवितांपैकी ही ‘कदंब’ वृक्षाची कविता.

कागदाचे पक्षी


तर या क्षणी
कागदांच्या लगद्यापासून बनवलेल्या
पक्ष्यांची एक माळ आहे
वाऱ्यावर ती किंचित हलतेय
जागच्या जागी

कागदांवर लिहिली असतील कुणी
प्रेमपत्रं अज्ञात भाषालिपीत
लिहिल्या असतील कविता
किंवा हिशेब
किंवा सजा सुळावर चढवण्याची
… सारं पोटात घेऊन
झुलताहेत हलकेच रंगीत पक्षी

पक्षी पिंजऱ्यात नाहीत
की त्यांची मुक्तता करता यावी
पक्षी स्मरणात नाहीत
की त्यांना विस्मरणात धाडता यावं
पक्षी कागदाच्या लगद्यात आहेत

झाडाचा कागद कागदाचे पक्षी
हा न्यायच असेल कदाचित
मला मधल्यामध्ये
अपराधी वाटतंय उगा

पडदा


नाटक संपलंय
पडदा टाक
मी खुणावलं

तर त्या जख्ख हातांना
खेचता येत नव्हता
पडद्याचा दोर

मग भूमिका टाकून
मी गेले
त्याला हात द्यायला

पर्याय


तुला शब्द आठवतो की ओळ?
कविता आठवते की संग्रहाचं नाव?
कवी की प्रकाशक?

तुला डोळे आठवतात की स्वप्न?
ओठ आठवतात की चुंबन?
कपडे की देह?

बर्फ की पाणी की वाफ आठवते
की आठवते तहान?
की हाक?

नदी की पूल?
पूल आठवत असेल
तर चालत जा ओलांडून निघून इथून.

स्वीकृत


जितके तास स्वप्नं पडतात
तितका वेळ दररोज
मी असते
मरून गेलेल्या माणसांसोबत
दुरावलेल्या माणसांसोबत
अप्राप्य माणसांसोबत
ज्यांनी ज्यांनी
दु:ख दिलं
दुखावलं सुखानेही
त्या
माणसांसोबत

खूप थकवा येतो
थकव्याने
खूप झोप येते
झोपभर
खूप स्वप्नं पडतात
स्वप्नात
पुष्कळ माणसं दिसतात

आता कशालाच नाही म्हणत
नाही मी
झोपेला स्वप्नांना थकव्याला
माणसांना जिवंत वा मृत
पाहते सगळ्यांकडे
कोरड्या डोळ्यांनी
कुणी काठी दिली
कुणी हात कुणी शब्द
कुणी नकार
कुणी पाठ
सगळे ठिपके एका पुसट
रांगोळीतले
वारा येईल उडून जातील
माझ्यासह

सगळं स्वीकृत आता