Archive | September 2013

प्र. ई. सोनकांबळे : मायाळू माणूस


काही माणसं अधूनमधून अकारण आठवतात; म्हणजे जिवंतच असतात ती आपल्यासाठी. ( आणि काही लोकांविषयी कुणी अवचित काही विचारलं तर ते जिवंत आहेत की नाहीत हेच आठवत नाही.) आजकाल मला ‘चांगलं वागणारी’ माणसं जास्त आठवताहेत. चांगुलपणाची डेफिशिअन्सी तयार झाली असावी आयुष्यात बहुतेक.

सकाळीच आठवण आली ती प्र. ई. सोनकांबळे सरांची. अत्यंत प्रेमळ माणूस, असं त्यांचं तीन शब्दांत वर्णन करता येईल. प्रेमळपेक्षाही ‘मायाळू’ हा शब्द अधिक अचूक! मी औरंगाबादला आर्ट स्कूलमध्ये शिकत होते, तेव्हा कधीमधी सरांची भेट होई. कधी ते आर्टस्कूलमध्ये येत, कधी एखाद्या कार्यक्रमात दिसत. त्यांचं भाषणही सहज संवादासारखं अगदी साधेपणाचं असे.
दरवर्षी एका महाविद्यालयातील विद्यार्थिनीसाठी ते आपल्या आईच्या ‘गुणाबाई’च्या नावानं बक्षीस देत. ते एकदा मला मिळालं होतं. त्यांची ती मी न पाहिलेली आईही मला त्यांच्यासोबत आठवते.
मी बी.एफ.ए. करताना ऑक्टोबरच्या टर्ममध्ये एम.ए.ची परीक्षा देऊन समांतररीत्या एम.ए. देखील पूर्ण करायचं ठरवलं. पहिल्याच वर्षाच्या पेपरच्या आदले दिवशी माझ्या मामी हार्टच्या ऑपरेशनच्यावेळी वारल्या. परीक्षा न देता मी नांदेडला गेले. मग एप्रिलमध्ये दोन्ही परीक्षा सोबत आल्या. पहिलाच पेपर क्रॉस होत होता. पण आर्टस्कूलचे काही ‘पेपर’ तीनतीन दिवस चालतात; त्याचा फायदा घेतला. सेंटर नेमकं सोनकांबळे सरांचं कॉलेज. एका परीक्षेतून उठून घाईत गेले आणि परीक्षेच्या काळात सरांना भेटू नये, संपल्यावरच भेटावं असंही वाटत होतं. पेपर सुरू होऊन जेमतेम पंधरा मिनिटं झाली असतील, सर राउंड घ्यायला आले. आल्यावर आधी विद्यार्थ्यांना अनौपचारिक शुभेच्छा, मग प्राध्यापकांशी आपुलकीनं बोलणं… मग रांगेतून फिरताना त्यांना मध्येच मी दिसले.
“अगं, तू इथं कशी? तू तर चित्रकला शिकतेस ना?” म्हणत त्यांनी चौकशी सुरू केली.
सगळा वर्ग पाहतोय म्हटल्यावर मी ओशाळी झाले, पण त्यांच्या मोठ्या आवाजात गप्पा सुरूच. मग एकदाचं हुशार मुलीचं सर्टिफिकेट त्यांनी मला खणखणीतपणे देऊन टाकल्यावर मी उभी राहिलेली बसून पेपर लिहायला सुरुवात केली. राउंड झाल्यावर पुन्हा जवळ येऊन त्यांनी विचारलं,”चहा पाठवू का तुला? तिकडे परीक्षा देताना जेवलीस तरी की नाही? मेसमध्ये जेवण बरं असतं का?”
माझ्या डोळ्यांत पाणी तरळलं. म्हटलं,”सर. चारी पेपर संपले की तुमच्या केबिनमध्ये येऊन चहा पिऊन जाईन.”

‘आठवणींचे पक्षी’ हे सरांचं आत्मचरित्र. या पुस्तकानं शाळकरी वयात माझ्यावर मोठे संस्कार केले. त्यातला एक धडा आम्हांला सातवी का आठवीत अभ्यासात होता. त्या अनुभवाविषयी मी माझ्या ‘ग्राफिटीवॉल’ या पुस्तकात लिहिलंय. अन्न, कपडे काहीही अनावश्यक संचय करून ठेवणं किंवा माज करून एवढ्यातेवढ्या कारणानं फेकून देणं मला आजही जमत नाही. चांगली पुस्तकं कोवळ्या वयात हाती पडली की संवेदनशील मनं विचारीही बनतात. योग्य विचारांचं वळण ज्या पुस्तकांनी मला लावलं त्यातलं हे एक पुस्तक. खरंतर विद्रोहाचं वय, चळवळींमधून येणारा आक्रस्ताळेपणा योग्यच वाटायचा तेव्हा… त्याचवेळी एक माणूस प्रेमळ वागून, समजून घेत किती मनं बदलू शकतो, किती विद्यार्थी घडवू शकतो, हे मला त्यांच्यामुळे समजलं.
पुढे संपर्क तुटला. एकदा औरंगाबादला गेले असताना त्यांना भेटावं म्हटलं, तर श्याम देशपांडेनी सांगितलं की,”सरांना स्मृतिभ्रंश झालाय. कुणालाच ओळखत नाहीत.”
तरीही जावं की नाही अशी चलबिचल होत राहिली. पण हिंमत झालीच नाही अखेर. आपल्या माणसांचे कोरे डोळे पाहणं फार अवघड असतं.
मग केव्हातरी सर गेल्याची बातमी वृत्तपत्रात वाचली. मनात आलं, आपला स्मृतिभ्रंश होत नाही तोवर सर जिवंतच असणार आपल्यासाठी!

९. बार्किंग न्यूज


आप्लं डोक्यात दुसरंच काईतरी सुरू आसावं, काई ना सुचून आपण उगं टीहीसमुर बसून च्यानल फिर्वत बसावं,
त्यात न्येमकं न्यूज च्यानल लागावं आणि श्क्रिनीवर मोठाली आक्षरं भकाभका भकाभका उघडमिट होआवीत – बार्किंग न्यूज! आपण दचकू दचकू डोळ्यांत जीव आणून फावं का झालं जणू?
आणि मग आराराबांची गर्जना उमटावी का, “रेल्वे रोमियोंना झोडपून काडा.”
आदी आराराबा म्हण्ले का, “सावकारांना कोप्रापासून ढोप्रापरेंत सोलून काढा.”
लोकांलेबी नकु त्येंचं नकु त्ये आईकायची हाऊस भारी. बियाणाची झैरात नाना कर्तुय म्हणून बियाणं घ्येणारे श्येतकरी आप्ले; त्येयनी सावकारांले झोडपाय सुर्वात क्येली आणि ग्येले तुरुंगात. आजूक कोर्टाच्या खेपा घालून र्‍हाईलेत आणि कोणी कर्जबी द्येईना आता त्येंना. आराराबा बोल्ले आणि न्यूज पाहात बस्ले का किती प्रबाव हये आप्ला? 
आपण हिंसा करायले सांग्तो… याले सोला म्हण्तो, त्याले झोडपा म्हण्तो… आणि आता ह्ये झोड्पायचं काम करायचं कोणी? तर रेल्वे पोलिसांनी! त्ये कुठं आसत्येत? कुठून शोधून आणाव त्येयला झोडपायला? तर आराराबा म्हण्ले का आजूक शंबर पोलीस घ्या, ग्येलाबाजार गृहरक्षक दलाचे आजूक शंबर जवान घ्या! आणि काय मानवाधिकाराची क्येसगीस झाली तं प्रकर्ण आपल्याकडं धाडा!
मानवाधिकाराची क्येस होऊ शक्ते आसं आधीचं इनडायरेक्टली सांगून ठिवलं म्हण्ल्यावर कोण जाणार झोडायले? त्ये काय फोकटचा पुख्खा झोडायले महानैवेद्याचं भोजन हये का पोलीस आणिक जवान म्हण्जे गणपतीच्या राजाचे कार्यकर्ते हयेत? झोडल्यावर आराराबा याक्शन घित नाइती, आसं लालबागच्या बार्किंग न्यूज कवर करणार्‍यायनी खासगीत सांगून टाक्लं रेल्वे पोलिस आयुक्तांले.
इत्क्यात आम्च्या घरात्ला बदलापुरातली बार्किंग न्यूज द्येणारा यांकर आला. म्हण्जे आमच्या ध्यानाचे जिगरी दोस्त गंजु भावजी. मी म्हण्लं,”गंजुभावजी, उलुसं दम धरा. आदी ही न्यूज बघुंदे. मागनं तुमची न्यूज सांगा.” 
आराराबांकडं त्यीन सेकंद पाहून गंजुभावजी म्हण्ले, “आता आराराबाच्या मोठ्या शेरातल्या ल्हान गोष्टीवर लोक ज्योक करूकरू कट्टाळले. मराठीत कमी पल्डं का काय, पण हिंदीवालेबी जितंतितं ल्हान आणि मोठं करून पाहाय लाग्ले. मोठ्या रात्रीतली ल्हान सपनं सगळ्यायले पडू लाग्ली हयेत.
आप्ला प्रभंजनकुमार रणनवरे हये ना… त्यो न्यूजच्यानलवर पत्रकार म्हून लाग्लाय.
कोणी चिक्टवला त्येला त्ये आजूक  त्ये समजायचं बाकी हये. पण पक्की बार्किंग न्यूज हये आप्ली.”
आरुणआप्पा सुपारी कातरायचं थांबवून इचार करू लाग्ले का ह्यो प्रभंजनकुमार रणनवरे कोण? आसं कोणी बदलापुरात र्‍हातंय आणि आपल्याले ठाव कसं नाई? भायेरून लई लोक येयाले लागल्येत आता बदलापुरात. जावई मनसेचा आसून काय उप्योग?
त्येंचं मन ह्येरून मी सांगलं का,”आप्पा, त्ये प्रभ्याचं सांगून र्‍हईल्येत.”
आप्पा दचकलेच. म्हण्ले,”हा… प्रभ्या रण्नवरे… म्हाइती हये…बरं झालं चिकट्ला कुठंतरी. या ब्येन्याची काळजीच हुती त्येच्या मायबापाले.”
सग्ळं बदलापूर खुशीत हुतं का प्रभ्या च्यानलला चिकटला.
भविष्यवाले जोशीबुवा म्हण्ले का, “त्यो नक्कीच मोठा यांकर हुणार आसं मी भविष्य सांग्लं हुतंच.”
“जोशीबुवा, तवा न्यूजच्यानल तरी हुते का? काईई फ्येकू नगा.” संकर्‍या वायरमन म्हणला.
“पण बाळाचे पाय पाळण्यात दिसतातच.” जोशीबुवांनी नेट लावला.”असं बघा, त्याच्या आईच्या बाळंतवेणा सुरू झाल्या. तिनं पहिलीच कळ दिली आणि ‘आ…ई’ म्हणून बोंब ठोकण्यास सुरुवात केली. तिचा आ ‘आ’च राहिला, तो ‘ई’पर्यंत पोहोचायच्या आधीच यानं ट्याहा ट्याहा ट्याहा सुरू केलं. किती तत्परता बघा. बारशाच्या वेळीही त्याचं नाव प्रभंजनकुमार असं पूर्ण सांगून होण्याच्या आधीच
याचं ट्यांहा ट्यांहा ट्यांहा सप्तसुरात सुरू. कुणालाही कधी पूर्ण वाक्य बोलू दिलं नाही यानं. अख्ख्या बदलापुरात विचारा. शाळेत विचारा. इतकं जमत असलं की पुरतं म्हणे च्यानलवाल्यांना.”
तितक्यात प्रभ्या तिथं पोहोचलाच. जोशीबुवांना तो येयाच्या आधीच आपण आप्लं बोलणं पूर्ण केल्याचं समाधान वाटलं. त्येचं आभिनंदन करत ड्रिंकर टेलर म्हण्ला,”पण पेप्रात का नाई ग्येला गड्या तू?”
“त्ये जुनं झालं आता. आणि हयेत कोण पेप्रांचे संपादक सांगा? आपण काम करायचं तर आपल्या इभ्रतीला शोभणारा संपादक नुको का? तसं कुमार मला म्हण्ला हुता का दिव्य मराठीला यितो का म्हून. नव्यानव्या आवृत्या काडायलेत, तर चांगल्या जबाबदार पत्रकारांची गरज हये म्हण्ला. पण मी मनात म्हण्लं का येकदा गोविंदरावांचा सल्ला घ्यावा. माझ्यासारख्या व्यासंगी पत्रकारांनी आभ्यासपूर्ण निर्णय घ्यावेत ना. त्येंना इमेल धाडला. तोवर ही च्यानलांची ऑफर आली; घ्येतली. म्हण्जे घ्यावीच लाग्ली. इत्का आग्रह क्येलावर आपल्या बदलापुरातले लोकायला कधी कोणाचं मन मोडता येतंय का सांगा? आता येशियाटिकला टिकेकर भ्येटला तर बदलापुराच्या काई आईतीहासिक नोंदी कोठल्या पुस्तकागिस्तकात भ्येटतात का ते बग म्हून सांगून ठिवायचं हये. लई कामं हईती. जातो मी.” आसं म्हणत प्रभ्या खुर्सीवरून ड्रिंकर टेलरला उठवून ट्येकला.

१०८. जगायचं


काही प्रश्न नसतात कधीच सुटणारे. काळाच्या ओघातही.
मग स्वीकारायचे ते.
नाइलाजानं वा निरूपायानं नव्हे, तर शांतपणे
स्वीकारायचे.
त्यांना एक जागा करून द्यायची. राहू द्यायचं.
घरातलं एखादं अपंग वा वेडं माणूस स्वीकारतो आपण
किंवा आपला एखादा आजार; तसं.

आणि मग प्रश्न बाजूला ठेवल्यानं
मोकळ्या झालेल्या जागेवर
दुसरं काहीतरी आणून ठेवायचं…
उदाहरणार्थ एखादं फूल
एखादा रंग वा गंध वा शब्द.

रमवायचा जीव जिवंत आहोत तोवर
जगायचं रसरशीत
मृतवत न होता
स्वतःची समजूत घालत स्वतःच.

१०७. हिंडगौरी


…तर ती बाई फिरतेय कधीची
माझं शरीर परिधान करून
सगळे पत्ते तिला ठाऊकयत
तिच्याच कमरेला खोवलाय
सगळ्या किल्ल्यांचा गुच्छा
सगळे पासवर्ड
सगळे कोडनंबर
त्याच सटवीकडे!

तिलाच विसरून गेलाय का निघून
माझा प्रियकर?
तिच्याच स्तनांवर आहेत का
माझ्या नवर्‍याच्या सिगारेटच्या
चटक्यांची वर्तुळं?
माझे गर्भ गळून गेलेत का
तिच्या गर्भाशयातूनच?
माझ्याच मुलांनी फुंकरून
उडवलीय का त्या म्हातारीला
वार्‍यावर मरणाच्या?

ती जन्मली होती गुपचूप
मी जन्मले तेव्हाच
माझ्याच आईच्या देहातून
माझ्याच बापाच्या वीर्यात
होतं तिचं बीज
माझी आणि तिची नाळ
एकाच मातीत पुरली

मग हा चिमूटभर जीव इथं ठेवून
कुठं फिरतेय ही हिंडगौरी
माझं शरीर परिधान करून?
बर्फ बनलेल्या तळ्यावर
का जाऊन उभीये?

अजून कोणत्या शिक्षेसाठी
ठेवलंय मला मागे?
गुन्हा तरी सांग…
नाहीतर
संपव तरी आता.

…………………………

108. घरबशी

जेव्हा एक बाई करीत असते विचार
पाणी भरता भरता स्वयंपाकाचा
घर झाडता झाडता मुलीला शाळेत पोचवायचा
धुणीभांडी करताना बाजारहाट करण्याचा
आणि करत राहते कामकाज यंत्रवत

त्यावेळी एका कवीला सुचत असतात नवे शब्द
एक चित्रकार पहाटेच घराबाहेर
निघून गेलेला असतो लँडस्केपिंगसाठी
एक शिल्पकार शोधत असतो शिल्पात दगड
एक गायक मनवत राहतो स्वरयंत्राला

बाईच्या एकसारख्या असतात
सकाळी दुपारी संध्याकाळी रात्री
रांगोळीलाही जागा राहिली नाही आता
अंगणही राहिले नाही किमान
तुळशीभोवती फिरावे इतके
ओव्या उरल्या नाही याचं दु:ख फिकं पडतं
जातं कालबाह्य झाल्याच्या सुखापुढे

चुकून कधी हाती आलाच कोरा कागद
तर त्यावर पडतात फक्त हळदीचे
पिवळेधम्मक डाग चित्राआधीच
त्यालाच चित्र मानावे फार तर
आणि शब्दांना येत राहतो वास
गरम मसाल्याचा

बाईला परवडत नाही चैन
कलाविचाराची!

१०६. स्वीकार


मी असणार नाही;
पण तुझ्यासाठी वाजणार्‍या टाळ्या
थांबल्यानंतरही
जी टाळी
शेवटानंतरही वाजत राहिली असेल
…ती माझी आहे समज!
– तू सांगितलं होतंस.

मी खरं मानतेय ते
आजही.

तुझं
असून नसणं नसून असणं
स्वीकारलंय अखेर मी.

१०५. एका जगात


एका जगात अनेक जगं
अनेक माणसं एका माणसात
रावणाच्या दहा तोंडांतलं
एक तोंड रामाचं
एक सीतेचं
एक लक्ष्मण एक बिभीषण
एक हनुमान
कुंभकर्ण एक एक वाली
एक शूर्पणखा
आणि एक मंदोदरीदेखील

एका वास्तवात अनेक वास्तवं
अनेक स्वप्नं एका स्वप्नात

तुझ्यात एक मी आणि
माझ्यात एक तू
हे भल्तंच रोमँटिक
आणि सोडून द्यायचं अस्तं
जे जे रोमँटिक ते ते आजच्या
काळात
हास्यास्पदय म्हणतात ते

एका भगव्यात लाल आणि पिवळा
एका हिरव्यात पिवळा आणि निळा
यांचं काय करायचं?
आणि एका पांढर्‍यातून येतात सगळे
एका काळ्यात लोपतात
त्याचं काय?

८. विधवा बनायची सपनं


आमच्या सुरेशभावजीचा पयले फ्यामिली बिझनेश हुता. म्हण्जे तेयच्या वडलांचं घड्याळाच्या दुरुस्तीचं दुकान हुतं. म्हणजे दुकान हये आजूक, पण आता थितं घड्याळ दुरुस्ती हुत नाई. काऊन का तर घड्याळं पयलेपयले लई सस्ती झाली; इत्की सस्ती का डुप्लिकेटाची गरज र्‍हईली नाई. त्येयच्या आजोबाच्या काळात तर घड्याळांचं स्मगलिंग हुयाचं म्हणे. म्हणजे त्यांचे आजोबा काई त्यातले न्हवते; आस्ते तर त्यांच्या पोरानं घड्याळाच्या दुरुस्तीचं दुकान बदलापुरात कायले टाक्लं आस्तं? तर आता कुठंय बी आणि कितीयबी घड्याळं मिळू लाग्ली. बायायच्या टिकल्यांची जित्की डिझाईनं आणि कलरं, तित्के डिझाईनं आणि कलरं घड्याळात आले. भिताडावर घड्याळं लावत्येत आजूक काई ओल्ड फ्याशनचे लोक, नाईतं राष्ट्रवादीचे लोक… आणि ज्येंना राष्ट्रवादी कायम ध्येनात ठ्येवावी लागत्ये त्ये बी लावत्यात. मनगटाले बांधायच्या घड्याळायची तशीच गत हाळूहाळू व्हयाले लाग्ली. ज्येच्यात्येच्या हातात मोबाईल आले. मोबाईलात घड्याळ र्‍हातेच. मग टाइम बगायले घड्याळ मनगटाले बांधायची गरज र्‍हाईली नाई. तरी आजून काई काई लोकं घड्याळं बांधत्येत; पण त्ये घड्याळं ब्रांड्येड र्‍हात्येत. आसल्यांकडं येक घड्याळ कधीच नस्तंय. पाच-धा तरी र्‍हातेत. मनाला येईल त्ये, शर्टाला शोभंल त्ये, नाईतं बायकोनं आज ह्ये बांधा मनगटाले म्हणून लाडीकपणानं हातात द्येलं त्ये… आसं कोण्तंतरी बांधायचं. त्ये डिझाईनचा भाग हये.
आता सुरेशभावजी काय राष्ट्रवादीत नाईती; तरी त्ये घड्याळ नेमानं बांधत्येत. म्हणजे उद्याच्याले पक्षांतर करायची गरज पल्डी तं आसू द्यावं म्हणून नाई काई… तर डिझाईनचा भाग म्हणून बांधत्येत. मनसेत आता डिझाइनला लई म्हत्व हये. राज ठाकरेनं सांगलं का श्टेजवरल्या ब्यानरींचं डिझाईनपण त्ये खुद च्येक करत्येत. उद्या विभागप्रमुखांचं डिझाईनपण त्येंनी च्येक करायचं ठरवलं तर काय करा? आप्ली आपण आधीपास्नं काळजी घितलेली बरी.
तर आम्ची राधिका आणि त्येयची शर्मिला म्हण्ली का, “त्ये नाकाचं डिझाईन दुरुस्त करून घ्या प्लाश्टिक सर्जरी करून.”
सुरेशभावजी म्हण्ले,”लई किरकिरी लावू नगं मागं. तुझ्या आईनं येक आयफोन काय घ्येऊन द्येला, तर इत्कं बोलायचं काम नाई.”
शर्मिलाचा खरा राग वायला हुता ह्ये त्यांना म्हाईती हुतं. का की त्येंनी शर्मिलाचे तोडे मोडून सोतासाठी उजव्या हातात घालायले चार तोळ्याचं कडं क्येलं हुतं.
आधीच्या काळी जरा बरी सोय हुती. म्हण्जे बायकूला दागिने घालायचे आणि तिले घ्येऊन मिरवायचं. मग आप्लं श्टेटश कळायचं लोकायले आपसूक. पण आता त्ये राखीव जागांचं फ्याड निंगल्यापासून बायकांले प्रचाराला, सभांना संगतीनं घ्येऊन जाणं सोयीचं र्‍हाईलं नाई. सुरेशभावजीची आई सांगायची का,”साप म्हणू नाई धाकला आणि  नवरा म्हणू नाई आप्ला.” तसं आता बायकूबी आप्ली म्हणायची सोय र्‍हईली नाई. काऊन की बाह्येर येऊन तिचंबी डोकं राजकार्णात चालायले लाग्णार. किचन पॉलिटिक्षपरीस तं देशाचं पॉलिटिक्ष कवाबी सोप्पं र्‍हातंय आसं तिला वाटणार… आणि मंग ती विधवा बनायची सपनं पाहू लाग्णार. का कवा मी विधवा हुते, पांडरीधोप साडी न्येसते आणि कवा नवर्‍याची खुर्सी सहानुभूतीपूर्वक जितते याचं पिक्चर तिच्या डोळ्यांपुढं जवा न तवा दिसू लाग्ते. बायकू नवर्‍याला लई येळंला “काळ्जी घ्या, जपून जा, येकदा घोड्याचं परमिट घिऊन टाकायले काय हर्कत हये म्हण्ते मी? कोण तुमच्या वाईटावर नाई ना पार्टीत?” आस्लं बोलायले सुरुवात कर्ते, तवाच नवर्‍यानं समजून घियाचं की बायलीच्या राजकीय म्हत्वाकांक्षा जागृत व्हयाले सुर्वात झाली हये!

७. व्हती चूक माण्साकडनं


लोकलराज ठाकरे बनणं काही आपल्याले वाटतं त्येवढं सोप्पं नस्तं. कित्ती कामं करावी लागत्येत बाप्पा! आमच्या सुरेशभावजींचा संघर्ष तर घरापास्नंच सुरू झाला. काई गोष्टींची डिट्टो कॉपी करायची म्हणली तरी करता येत नाई. म्हणजे राज ठाकरेंसारखं काका कुठून आणणार? काका नाई तर चुलतभाऊपण नाई. आता दर क्येशीत काई तरी वायलं आसतंयच. चुलतभाऊ नस्ला तरी सुरेशभावजींले सख्खा भाऊ हये. त्यो काई उद्धो ठाकरेपेक्षा कमी नाई का जास्ती नाई. आता त्याची आजूक यांजिओप्लाश्टी झाली नाईये; पण हुईल की, कोणायचीबी हुती आजकाल.
तर गोची आशी हुती का सुरेशभावजीयले मनसेचं बदलापूर शाखेचं विभागप्रमुख बनायचं मनात हुतं आणि त्येंच्या भावाले म्हणजे सतीशदादूयलेपण मनसेचं बदलापूर शाखेचं विभागप्रमुख बनायचं मनात हुतं. सतीशदादूले खरंतर निवडणुकीत उतरायचं हुतं; पण पर्सोनेल डिशिजन नडले. त्येंना लागोपाठ दोन पोरी झाल्या. पोर्गा हुवा होता. वंशाले दिवा पायजेच, दिवट्या काय कामाच्या? त्या लोकायच्या अंगणात उज्येड पाडणार आणि आपल्या घरादाराला हुंड्यापायी धुवून न्येऊन अंधार करणार. या नादात सतीशदादूले आजूक दोन पोरी झाल्या. तवरोक त्यांना नियमगियम कायदेगियदे काई म्हाईतीच नव्हते. पोरं हुणं ही आपल्या ब्येडरूमीतली खासगी गोष्ट हये आसं वाटत हुतं. फार्म भरायच्या येळंला, म्हणजे फार्म भरून झ्याल्यावर निवडणूक अधिकार्‍यानं सांगलं. इत्क्या येळंवर काय कर्णार? नंतर त्येयनी लई उचापती क्येल्या. जसं की चारापैकी दोन पोरी दत्तक घियाची आफर म्येव्हण्याले देल्ही.
पर सतीशदादूंचा म्येव्हणा लई पापभिरू, कायदे पाळणारा, नियमांले भिणारा, इमानदारांचा इमानदार हये. त्यो म्हण्ला का “मग पोरी माझ्या घरी नियाले लागतीला. त्येंचं सग्ळं करण्याची जिम्मेदारी कायद्यानं माझी र्‍हाईल. उद्याले त्या माझ्या प्रापर्टीत हिस्साबी मागतील. आता बहिणीनं मागितला हयेच; उद्याच्याले या पोरी मांगणार नाईती कशावरनं? तुम्ही हात झटकून मोकळे हुवाल पोरी तर दत्तक देल्ह्या म्हणून. चार्चार पोरी होवू दियाच्याच कशाले आदी?”
येकुणात निवडणुकीला हुबं र्‍हाण्याचा मार्ग बंद झाला. सतीशदादूनं तवाधरणोक फ्यामिली प्लानिंगच्या प्रचाराचं लई मनावर घिटलं. सोताचं उदाहरण धेत निचंतीनं सगळं विस्कटून विस्कटून सांगाईचे लोकायले. कोण आयकायचे, कोण म्हणायचे का आम्हांले काई निवडणुकीला हुबं र्‍हायाचं नाई. येक ना दोन.
आखरीले सतीशदादूच्या प्रेत्नाले यश लाभलं. त्ये बदलापुरातले मनसे विभागप्रमुख झाले. सुरेशभाईले उपविभागप्रमुखपदावर समाधान मानाव लाग्लं. त्ये त्यायनी लईच मनावर घिटलं. आपली फ्यामिली घियऊन येगळं र्‍हायला ग्येले. आता सोताले सिद्ध करण्यात काई अडसर नव्हता. त्याची सुर्वात म्हणून त्येंनी येक फोटोसेशन क्येलं. मग होर्डिंगी लावल्या. आशी कोशिस तर सुरू क्येली. सासूनं आशीर्वाद म्हणून आयफोनबी घिऊन देल्हा. यात काई पॉलीटिक्ष व्हऊन सासूले धोबीपछाड मिळंल असं त्येंच्या मनातबी आलं नाई.
आता सुरेशभाईची सासू तिच माझीबी सासू आस्ली तरी त्यात लई फरक हये. बायकोची सख्खी आई सासू असणं आणि नवर्‍याची सावत्र आई, तीही दुसरेपणाची, सासू असणं यात जमीनआस्मानाचा फरक असत्ये. त्येयच्या घरात जी सासू जावयाले डोक्यावर घियऊन नाचायची, तीच सासू आमच्या घरात सुनेच्या निस्तं डोक्यावर जाऊन नाई बसणार तर पार सुनेच्या कवटीतल्या लबडब मेंदूतला ट्यूमर व्हऊन र्‍हाणार.

मी आरुणआप्पाले म्हणलं का, “आप्पा, आयफोन देयाले हर्कत नाई. तुमची येकच ल्येक, तिचा येकच नवरा… जावयाचं मानपान नाई कराचं तर कोणाचं कराचं? पण त्ये सांगून करावं म्हण्ते मी. आम्हांला नाई हो… तुम्हांला सांगून. तुम्ही काई नाई म्हणले आस्ता का? देल्हाच आस्ता ना आयफोन. आजतवरोक देल्हं नाई का तुम्ही काई? हुंडा देल्हा, होंडा देल्ही, गेल्या आधिक महिन्यात धोंडा म्हूण स्यामसंगचा फ्ल्याट टीव्ही देल्हा. कधी हिश्येब काढला का कोणी का विच्चारलं काऊन देल्हं म्हणून? मंग तुम्हाले न सांग्तासवर्ता अकाउंटणकडून परभारे पयसे घियऊन आसं करायची काई गरज हुती का म्हणते मी!”

आरुणआप्पांचा चेहरा आता आडवाणींसार्खा दिसू लाग्ला. बघवना.
आखरीले मीच म्हणलं, “जावंदे आता. ताटातलं वाटीतच ग्येलंय नाई का. त्येंना काई बोलू नुका. व्हती चूक माण्साकडनं येखांदे टायमाला. बाई, तुमी आराम करा आता. सयपाकाचं काय त्ये मी बगत्ये. उगं सयपाकघरात हुबं र्‍हऊ र्‍हऊ पाय सुजायलेत तुमचे. शांत पडा आता जरा.”
सासू  नं. दोननं काही न सुचून मान डोलावली.

६. लोकलराज ठाकरे


म्यारेज यानेवरसारी नाई, ह्यापी बर्डे नाई, व्हलेंटाइन डे नाई, ग्येला बाजार फ्रेंडशीप डे पण नाई… आसा आधेमधेच येकदम मी आमच्या ध्यानासाठी आयफोन कामून आण्ला? याचं सासू नं. दोनच्या मनाला लईच लागून र्‍हाईलं. ह्ये आशी मनाला रुखरुख लागणं लई ब्येकार. मनात ठ्येवायचं तर मलावरोध हुयाची भीती आणि मनातलं कोणाले शब्दांत सांगायचं तर ढाळ लागलीच समजा! काय करावं काय करूने आसं मनातच विचार करत करत आखरीले तिनं विच्चारून मोकळं होयाचं ठरवलं. आता सरळ विच्चारलं तर मी काई साळसूद उत्तर द्येणार… ह्ये आता आस्तेआस्ते तिच्या टकुर्‍यात शिरू लाग्लं हुतं.
आता कस्काय आस्ते बघा… काई लोक डायरेक्ट पोलिटिक्ष खेळत्येत; पांढरेधोप कापडं घालून, जाकिटं-टोप्या घालून, भगवीनिळीपांढरीहिरवी उपरणी गळयात लटकवून, टिळे लावून, मागं पिसार्‍यावानी पाचपंधरा पंटरलोक बाळगून आपण पोलिटिशिअन हयेत हेयाची जाईरातबी झकास करत्येत. त्येंनी चांगलं काम क्येलं तं त्ये त्यांना बोंबलून बोंबलून सांगाव लागत्ये का आमी रस्ते बांधले, आमी पूल बांधले, आमी ह्ये आणि त्ये आणि त्ये आणि ह्ये क्येलं. होर्डिंगा लावा, पोष्टर चिपकवा किती भानगडी. पण वाईट केलेल्या, न केलेल्या, करून बिघडलेल्या गोष्टी लोकांना आधी समजतात. मग लोक शिव्या देयाले येकदम सामने… मतदानाले पिछाडीवर आसत्यात त्ये तर शिव्या घालायले सगळ्यात आघाडीले.
याच्या उल्टं… काई काई लोक राजकारणात कदीच दिसत नईत, पण त्ये सगळ्यात जबरी राजकारण खेळत्यात. आखाड्यात पाऊल न टाकता, नखालायबी माती लागू न देता कुस्ती जिंकतात; नायतर अंगाला तेल चोपडलं आसल्यागत आलगद निसटून जातात. पुरषांना कदी कळलं नाई… पण आसलं राजकारण बायका कईक पिढ्या खेळत आल्यात. ती दिसत्यात बायका-बायकांतली उंबर्‍याआत्ली भांडणं… पण गारद व्हत्यात मर्द. बायका भांडून, चिडून, मग रडून मोकळया व्हत्यात आणि भायेर मर्दायची डोस्की मेंदू कवायबी भस्सकन बाह्येर येईल आशी कवटी तडकलेली.
तर सासू नं. दोननं डायरेक्ट सासर्‍यांसमोरच अविश्वासाचा ठराव खोलला. त्यो त्यांच्यावर उलटणार आणि त्यांचं डिमोशन पक्कं हुणार याचा बाईला अंदाजच आला नव्हता. मी हिशेबाची वही काडली. जावयाले घितलेला आयफोनचा दाखला दिला.
मग सासू नं. दोननं आवचित मोसम बदलावा तसा टोन बदलला. लगालगा डोळे पाण्यानं भरले. नाकाचा शेंडा लाल झाला. आवाज लाडीक गहिरा बनला.
“लेकीसाठी तर क्येलं मी. काय दुसर्‍या कोणासाठी क्येलं का? आता जावई इत्का पोलिटिक्षमदी उतरलाय. मनसे जाईन क्येलाय. त्येला राज ठाकरेच्या वाडदिवसाचं शुबेच्चा धेणारं होर्डिंग लावायचं हुतं. त्यासाठी सोताचा नवा फोटो काडायचा हुता. आता निस्ते फोटो तर समद्यांचे र्‍हात्यात. आपलं वेगळं खुलून दिसाय नकू का? तर मला शर्मिला, म्हणजे आपली राधिका म्हणली का, ‘आई, यांना येक आयफोन घिऊन धे.’ देल्हा. कस्ल्या होर्डिंगी लागल्यात बघा जाऊन. वरच्या उजव्या कोपर्‍यात बोट उचललेला राज ठाकरे. खालच्या डाव्या कोपर्‍यात आप्ला डावा हात उचलून आयफोन दाखवणारा आप्ला लोकलराज ठाकरे… म्हणजे आप्ला जावई. वळखू यावं म्हणून त्येचं नाव गुलबाशी रंगाच्या टायपात… मान्नीय श्री. सुरेशभाई राजाराम नवले यांच्याकडून मान्नीय श्री. राज ठाकरे यांना हार्दिक शुबेच्चा! डिट्टो राज ठाकरे दिस्तो बघा आप्ला जावई. शेम तस्साच म्येकप केल्याय.”

मले आतनं लई हासू येत हुतं. सुरेशभावजीचं त्ये फोटोसेशन मले माईत हुतं. शेम राज ठाकरे सारख्या फ्रेमीचा चष्मा, तस्साच टिळा आणि पांढरेधोप कापडं घालून शेम पोझी द्येऊन फोटो काडले हुते. आता सुरेशभावजीचं नाक म्हशीनं आपल्याच शेणाच्या पोवट्यावर पाय दिल्यावर जसं दिसंल तसं हये, याला बाकी त्येचा काई इलाज नई. पण बाकी शेम. मले म्हणला हुता, “वईनी, फ्येसबुक जाईन करा. आप्लं प्रोफाईल फोटु बघा. लाईक मारत जा. किती दिवस आडाण्यासारखं र्‍हाणार बदलापुरात? काळाच्या संगत र्‍हाव माण्सानं.”
मी म्हण्लं का, “त्ये ठीक हये भावजी. पण खुद राज ठाकरेसंगट तुम्चा येकबी फोटो दिसंना? आस्कसं? तुमी तर लई सांगता का त्ये तुमाले किती मानत्येत.”
सुरेशचा चेहरा टपकन पल्डा. पण त्येनं त्यो विधुतव्येगानं उचल्ला. प्र्याक्टीस हये त्येंना. म्हणले, “म्हणून तर मी बायकूचं नाव शर्मिला ठिवलं. आता आपल्याले नशिबानं त्येंच्यावानीच येक पोर्गा, येक पोर्गी झाले. गावठी का आसनात पण आपण कुत्री पाळण्याचा शौक पण क्येलाच! आपलं नशिबाचं लक चांगलं हये…”
सुरेशभावजी बोल्ता बोल्ता थबकले. त्येंचा चेहरा चिंतातूर दिसू लाग्ला.

५. सासू माझी नवसाची!


आमचं ध्यान तसं लई आईयेडं हुतं. आरुणआप्पा रागीट, त्यामुळं तर ह्ये सारखं आईच्या पदराला धरून धरून असायचं. पण डिशिजन घेयाची पॉवर नाई. आईला बरं नाई म्हणलं तर ह्ये रात्रभर तिच्या उशापायथ्याले बसणार; तिचं डोकं दाबून दे, पाय दाबून दे आसं करणार. पण तिला जिल्ह्याले घ्येऊन जाऊन चांगल्या डाक्टराले दाखवून आणूत म्हणलं तर गपगार; कारण का तर त्यो डिशिजन आप्पांचा.
सासू नं. दोननं घराचा बघता बघता ताबा घ्येतला आणि मुख्य दोन खोल्या – किचन आन ब्येडरूम आप्ली राजधानी आन उपराजधानी बनवून टाकल्या. जबरी किचन पॉलिटिक्ष खेळणारी पोलीटिशियन म्हणजे आमची सासू नं. दोन. आता किचनचा ताबा घ्येतला म्हण्जे सयपाक तीच करणार आसं नाई काई… तर डिशिजन ती घ्येणार.
कोण्ची भाजी करायची, कोण्च्या पद्धतीनं करायची, किती करायची, तिच्यात काय घालायचं आणि काय घालायचं नाई… त्येच डाळीचं, चटणीचं, कढीचं, भाकरीचं…
पांढरा कांदा का तांबडा कांदा?
लाल मिरची का हिरवी मिरची का तिखटाचा भुकणा?
काळी मिती, दालचिनी, तमालपत्रं, दगडफुलं, लवंगा, येलदोडे काय आणि किती?
फोडणी राईची की जिर्‍याची?
चिंच का कोकम का कैरी?
वरणात फोडणी घालताना गार पाणी घालायचं का गरम करून घालायचं?
तांदळाची जात आज कोणती घ्यायची?
भाकरी बाजरीची कधी, नाचणीची कधी, ज्वारीची कधी आणि तांदळाची कधी आणि चपात्या कधी आणि पोळ्या कधी? साखर की गुळ?
येक ना धा… हज्जार गोष्टी.
सादी चाय करायची तर सासू नं. दोन मागं येऊन हुबं र्‍हाणार आणि सांगणार का चाय पावडर इत्की, साखर्‍या इत्का आणि दूध इत्कं! दूध गायीचं की म्हशीचं? डिपेंड! चाय कोणाला पाजायचीय त्येच्यावर त्ये सगळं डिपेंड. आप्पाला निस्त्या दुधाचा दाट पांढराधोप चहा; जावयाले तर चायमध्ये सायपण; मग बाकीच्यायचं डिमोशन हालके हालके.
सासू नं. तीनची तवा नुकतीच यंट्री झाली हुती. तिला तिच्या कमर्‍यात ताट वाढून जायचं.
तर त्या दिवशी ताट घिऊन मी ग्येले. खोली कडंची. बारकी.
सासू नं. तीन संकोचून, आक्रसून बसलेली. तिच्यासमोर ताट ठिवलं आणि लगालगा निघून न जाता तिथंच बसले. म्हण्लं,”एकलीला ज्येवण जायचं नई, तर सोबत थांबते जेवण होईस्तो.” आणि पदराच्या गाठीत बांधलेल्या पुरचुंडीतून गुळाचा खडा काढून वाढला. म्हण्लं, “हितलं ज्येवण जरा तिखट र्‍हातंय.”
तर सासू नं. तीनच्या डोळ्यांतून पाणी खळंना.
तिला पोर हुत नई म्हणून घरच्यांनी कावळ्यावानी टोचू टोचू तिला आखरीले घराभायेर निघून जायला, जीव द्यायला भाग पाल्डं हुतं. माहेरीपण कोणी विचारणार नई म्हाईती हुतं. कोणाकडं बघून आयुक्ष काडायचं म्हणून बाई जगणं संपवाय निगाली हुती. तिथं तिला आरुणआप्पा भ्येटले. आत्महत्या क्येली का या जल्मातलं सिल्लक दुख म्होरल्या जल्मात कंटीन्यू हुते, आशी थिअरी त्येंनी तिला सांगली. म्हणून या जन्मीचं याच जन्मी भोगून मरण स्वतःहोऊन येईल तेव्हाच माणसानं मराव म्हणले.  तिला आपल्या घरी घिऊन आले.
मी सासू नं. तीनच्या पाठीवर हात फिरविला. धीर देल्हा. मी तुमची सून आस्ले तरी लेकीसारखं माना म्हणलं. सासू नं. तीनचा गळा दाटून आला.
मग मी आप्पांकडे विषेय काढला का, “आप्पा, नव्या सासूबाईंना आपल्यावालं ज्येवण सोसत नई. त्येंचं त्येंना बनवून घिऊ द्या की त्येंच्या पद्दतीचं. तब्येत बिगडली तर उगा अवषदपाणी करावं लागायचं.”
आप्पांनी माज्याकडे कवतुकानं पाह्यलं. मग मी नेक्ष्ट मुद्दा रेटला. “आणि आप्पा, त्यो कडेचा कमरा काय कमरा हये का? अडगळीचा बार्का कमरा हये त्यो. थितं ना उज्येड ना गिज्येड.”
“तिनं जसं हये तसं र्‍हावं. तुझ्याक्डं कंम्प्लेन्ट क्येली का काई?” आप्पा सुपारी फोडत गरजले.
“त्या कशाले कंम्प्लेन्ट करतील आप्पा. आसली शांत, सोशिक, समजूतदार, द्येखणी बाई तर बदलापुरात काय माझ्या म्हायेरी किनगावलापण पाह्यली नई मी. जणू नवसानंच आसली सासू मिळाली मले.”
“मग?”
“कमरा काय त्येंचा नाई आप्पा… कमरा तुमचा! म्हण्ज्ये तुमचीच दुसरी ब्येडरून नई का? मग तुमाले साजेसा, चांगला कमरा पायज्ये ना? आसल्या कमर्‍यात कशी झोप लागन तुम्हाले? आणि रातचं उठून उगा पुन्हा या ब्येडरूमीतनं त्या ब्येडरूमीत कशाले जा-ये करायचं गुंगार्‍यात?”
आप्पा सुपारी कातरायचे थांबले. त्येंचा चेहरा आरुण गवळी आयवजी ओशोंसारखा दिसू लाग्ला.
त्येंनी मान डोलावत विचारलं,”पण दुसरा कोण्ता कमरा खालीये?”
मी म्हण्लं,”आईंचा!”
त्येन्ला ठस्का लागला. मी म्हण्लं,”तुमी काई काळजी करू नका आप्पा. मी यान्ला सम्जावते काय ते.”
मग आमच्या ध्यानाला सम्जावलं. म्हण्लं,”त्येंना ना लेकरू ना बाळ. मायेला भुकेली बाई हये. त्येन्ला आईसारखं माई म्हणा. तुम्हाले बी बरं वाटंल आणि वरती आईंनापण काळजी र्‍हाणार नाई तुमची.”
सासू नं. दोन भडकली,”मले बाई आणि तिले आई म्हण्तो?”
आप्पा बोलले,”तूच तं सांगलं हुतं का बाई म्हण म्हणून. आता कम्प्लेन्ट काईला करते? इत्की वर्सं बाईच म्हण्तोय ना त्यो तुले?”
आप्पाची ब्येडरूम नवं सामानसुमान आणून लाव्ली. येका कोन्यात सासू नं. येकचा फोटो लावलेला हुता तो तसाच र्‍हाऊ देयाचा आसं सासू नं. तीनला सांगलं. ज्ये काय पलंग, पडदे, गादी, चादरी, रजया, टीव्ही, टीव्हीवर ठिवायचा फ्लावरपॉट आशी समदी खरेदी क्येली; त्येच्यात येक आयफोन अ‍ॅडज्येष्ट करावं आसं मनात आलं येकदा, पण क्येलं नाई. तसं क्येलं तर सासू नं. दोनमध्ये आणि आपल्यात फरक काय ?
आप्पांना हिशेब दावला. म्हणलं,”आप्पा, तीसेक हजाराचा गफला हये. क्याश कुटं ग्येली काई समजत नाई. आता डेंग्यु बरा होऊन अकाउंटण आला का त्येला विचारा. आणि पायजे तर रजा द्या त्येला. हिश्येब मीच बगत जाईन.
नाईतरी मी यवडी शिकल्येली हये त्येचा उप्योग कवा आणि कसा हुणार?”
“ब्रारं.” आप्पा म्हणले. तरी  मी घूटमळत हुतेच. “काय्झालं? र्‍हायलं का काई?”
“आप्पा, त्ये अकाउंटणला त्येत हुतात तो पगार मला देशिना का?”
“का गं पोरी? तुले काय कमी पल्डं या घरात? काय पायज्ये त्ये मागायचं ना? पगार कशाले? काई घ्येयायचंय का?” आप्पांना नवल वाटलेलं दिसत हुतं.
“तसं नाई आप्पा… काय्ये ना… मले येक आयफोन घियाचा हये. म्हण्जे माझ्यासाठी नुको… येंच्यासाठी.”
आणि आप्पांनी तिजोरीच्या किल्ल्या माझ्याकडे दिल्या. गहिवरून आपल्या नव्या ब्येडरूमीच्या दिशेनं बघत म्हणाले,”आता तूच मालकिण आणि तूच अकाउंटण. सगळ्यांचा इत्का विचार करतेस, तर तूच संभाळ आता.”