पालीचं पिल्लू


आज एक असभ्य फोनकॉल आला. तेव्हा माझ्यासमोर एक कवितांचं बाड होतं आणि मी त्या ओळींमध्ये गुंतत, पुन्हा गुंत्यातून बाहेर पडत बारीकसारीक दुरुस्त्या करत बसले होते. फोन घेतला तेव्हा मी चष्मा बाजूला काढून ठेवला आणि खुर्ची फिरवून खिडकीच्या दिशेने वळले. खिडकीखालच्या भिंतीवर एक पालीचं पिल्लू फिरत होतं. चपळ. कधीतरी दोनचार वर्षांमधून एखादवेळी मी घरात पेस्टकंट्रोल करून घेते, एरवी झाडूबिडूनं पाली मारणं, हाकलणं असे उद्योग करत नाही. कदाचित मला आता त्यांची सवय झालीय. पूर्वीइतकी घृणाही वाटत नाही. त्यांच्याहून अधिक बीभत्स रूपं बघत गेल्यामुळेही असेल असं.
त्या पिलाकडे बघत-बघत मी फोनवरचं बोलणं ऐकून घेतलं. उत्तर दिलं नाही आणि फोन बंदही केला नाही. बंद केला असता तर हा निनावी प्राणी पुनःपुन्हा फोन करत राहिला असता. हां, हो, बरं असं म्हणत ऐकत राहिले. त्याचा संताप इतका वाढला की अखेर त्यानं अजून एक ठेवणीतली शिवी देऊन फोन बंद केला.

भिन्न आली त्या काळात बराच काळ हे रुटीन होतं. नंतर शमलं. पण मध्येच कुणीतरी पुन्हा ते पुस्तक वाचतं. भडकतं. खरं असलं तरी लिहिलं पाहिजे का? – असा त्यांचा बेसिक मुद्दा असतो. खासकरून त्यात पंढरपूरच्या वेश्यावस्त्यांविषयी लिहिलेलं लोकांना आवडत नाही. काहीजण हे खोटं असल्याचाही आरोप करून मोकळे होतात. आजही त्यांनी पंढरपूरला जाऊन पहावं, इतकंच मी सांगू शकते. या बाकी वाचकांचं मी एकवेळ समजून घेऊ शकत असे, पण लिहिणारे समकालीन असभ्य वागतात, तेव्हा चकित व्हायला होई. हे मुद्दाम भूतकाळात लिहितेय, कारण लिहिणार्‍यांच्या तीव्र भावनांमध्ये मत्सरादी भावनाही येतातच, हे तेव्हा उमजत नव्हतं.

घटना अशी होती :
एका साहित्यसंमेलनाच्या पुस्तकप्रदर्शनातून पहिला फोन आला, “एका वाड्मयीन अनियतकालिकात तुमच्याविषयी अश्लील लिहिलं आहे. थेट नाव नाही, पण नावातली अक्षरं फिरवलीत आणि ‘भिन्न’वर कोट्या केल्यात.”
त्यांनी मजकूर वाचून दाखवला. कानावर विश्वास बसत नव्हता. काहीच बोलले नाही.
मग अजून काही फोन आले.
तिथंच काही पत्रकार मित्रांनी आक्षेप घेतला आणि संबंधित संपादकाला सुनावलं. त्यानं सारवासारव केली की, मी हे वाचलेलंच नव्हतं.
मग त्यांनी ते पान चिकटवलं. चिकटवलेलं पान पाहून लोक उलट ते उकलून पाहण्याचा प्रयत्न करत आणि वाचत. काही फोन अजून आले.
एक पत्रकार मित्र म्हणाला,”बातमी करायची का? हे फार चुकीचं आहे.”
मग मला खाडकन उत्तर सापडलं. म्हटलं,”अजिबात बातमी करायची नाही. त्यामुळे ज्यांना माहीत नाही त्यांनाही माहीत होईल. अंकाची फुकट जाहिरात होईल. खप वाढेल. त्यांना हेच हवं आहे. आपण त्यांना त्यात मदत करायची नाही.”
“मग काय गप्प बसायचं?”
“अजिबात नाही. दुसरे मार्ग आहेत ना.”

मग साहित्य क्षेत्रातल्या काही मान्यवरांना आणि माझ्या निवडक मित्रमैत्रिणींना हे फोन / एसेमेस / इमेल्स द्वारे कळवलं आणि सांगितलं की,”तुम्हांला हे चुकीचं वाटलं असेल तर फक्त एक फोन / एसेमेस / इमेल या मार्गाने निषेध नोंदवा. पुढील अंकात क्षमा मागायला सांगा.”
पंधरा दिवस त्याच्यावर असा ‘सभ्यास्त्रांचा’ मारा झाला.
एका उत्साही मित्रानं सांगीतलं की,”चार पोरं चार बुथवर बसवतो आठवडाभर आणि दर पंधरा मिनिटांनी एक कॉल मारायला सांगतो. शिव्याबिव्या देणार नाही, फक्त जाब विचारणार आणि माफी मागायला सांगणार.”
एका पैलवान मैत्रिणीनं मात्र हे जुमानलं नाही. तिला दोन-तीनच शिव्या येत होत्या. तिनं दोनचार मित्रांना फोन करून कागदभर शिव्या लिहून घेतल्या आणि ऐकवल्या.
एक अतिसभ्य कवीमित्र आहे. त्यानं निराळा उपाय केला. “काय झालं रे?” अशी माहिती त्यालाच विचारली. रडकुंडीला आलेल्या त्या बिचार्‍यानं पाढा वाचला. मग यानं समजूत काढली आणि सांगीतलं की,”कविताच्या भानगडीत पडू नकोस. फार डेंजर बेणं आहे. आणि हे बग, चारसहा महिने कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमांना जाऊ नकोस. मी असं ऐकलंय की, तू दिसलास की ती तुला चपलेनं मारणार आहे म्हणे.” हे बोलून तो थांबला नाहीच. दर आठदहा दिवसांनी त्याला फोन करून विचारायचा की,”ठीक आहेस ना रे? मारबीर पडला नाही ना? गेला नाहीस ना कुठे?”

यानंतर या मासिकाचा पुढचा अंक प्रकाशित झाला. एका लेखिकेशी ‘नामसाधर्म्य’ असल्याने त्यांचा गैरसमज झाला, आम्हांला तसं म्हणायचं नव्हतं, इत्यादी नोंद चौकटीत बारीक छापलेली.
तो त्या मासिकाचा शेवटचा अंक होता.
अशा रीतीने अवाड्मयीन कारणाने एका वाड्मयीन नियतकालिकाचा अंत झाला.
आजच्या फोनवरची भाषा ऐकून हे सारं पुन्हा आठवलं.
ते पालीचं पिल्लू खिडकीबाहेर का निघून गेलं, काय माहिती!?

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s