चार लघुतम कथा


१.
घरात फक्त घासभर अन्न शिल्लक होतं. खायला बसणार तेव्हाच दारात एक पोट खपाटीला लागलेला माणूस आला. त्याचं लक्ष ताटलीत ठेवलेल्या त्या घासाकडे गेलं. मागावं की मागू नये, असा पेच त्याला पडला; कारण ज्याचा घास होता तोही तशाच अवस्थेत दिसत होता.
तरीही हा घास खाल्ला तर अजून एक दिवस जगता येईल आणि अधिक अन्नाचा शोध घेता येईल, या आशेने त्याने याचना केली.
क्षणभर त्याच्या नजरेकडे पाहून याने निमूटपणे ताटली उचलून त्याच्या हाती दिली आणि दार आतून बंद करून घेतलं.
याचकाला सारं अविश्वसनीय वाटलं, तरी त्यानं आधी घाईने खाऊन घेतलं. तिथून जाताना तो स्वत:शी बडबडत होता,”त्याचं डोकं फिरलेलं असावं बहुतेक. एकच घास होता तो मला दिला, आता त्याचा भूकबळी पडणार आज रात्री.”
दाता शांतपणे घोटभर पाणी पिऊन लटपटत अंथरुणावर पडला. मनात म्हणाला,”बरं झालं. उद्यापासून रोज अन्नाचा शोध घेत वणवणत फिरणं संपेल एकदाचं. त्या बिचाऱ्या याचकाची मात्र इतकी सहज सुटका होणार नाही.”
०००

२.
“काहीही बोलायचं नाही. अजिबात आवाज नकोय मला. हातांची घडी आणि तोंडावर बोट… गप्प बस एकेजागी मांडी घालून.” आई मस्ती करणाऱ्या छोट्या मुलाला करवादून म्हणाली.
थोड्यावेळाने तिने डोकावून पाहिलं, तर तो तिनं सांगितलं तसाच बसून होता. त्याचे डोळे तिच्यावर रोखलेले होते. आई चिडून म्हणाली,”एकदा सांगितलेलं कळत नाही का? काहीही बोलायचं नाही…”
०००

3.
एका आयुष्यात तिला सात आयुष्यं जगावी लागली. त्या कारणाने तारुण्यातच ती थकून गेली होती. तिचा ना ईश्वरावर विश्वास उरला होता, ना माणसांवर प्रेम.
रात्री आकाशातल्या पांढऱ्या ढगाशी बोलताना ती म्हणाली,”मला कायमची, गाढ आणि शांत अशी काळझोप मिळावी किंवा माझ्या आसपास एखादं जागं माणूस असावं.”
ढगाने ऐकलं आणि मग तो वाऱ्यावर वाहून गेला.
०००

४.
लोक घेराव घालून त्याच्याभोवती उभे होते. त्यांचं एकच मागणं होतं,”इतकी वर्षं तू लपवून ठेवलं आहेस, ते रहस्य आम्हांला हवं आहे.”
लोकांच्या हातातले तळपते सुरे पाहून त्याचा नाईलाज झाला. त्यानं आपलं जतन केलेलं रहस्य लोकांच्या हवाली केलं.
लोकांनी एकच जल्लोष केला,”मिळालं… मिळालं… मिळालं…”
तो खेदाने मान हलवून म्हणाला,”नाही. आता ते रहस्य राहिलं नाही.”
०००

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s