Archive | March 2014

१४. काप पंचायतीची स्थापना


बदलापुरात न्हेमीच येगळे वारे वाहात्येत. म्हण्जे त्ये भूगोलात आसत्यात मोसमी वारे वायले आणि बदलापुरात वाहणारे वारे वायले. खारे वारे आणि मतलई वारे तर समद्या दुनियेत आसत्यात. इथले वारे ह्ये खरे वारे आणि मतलबी वारे आसत्यात. आता त्येबी समद्या दुनियेत आसू शकतात, म्हाईती नाई, आपला काय त्येवडा आभ्यास नाई. 
प्रभ्याला इचारावं लागंल.
पण प्रभ्यानं च्यानलला चिकटल्यापास्नं आभ्यास करणंच सोडून दिलंया. नव्या जमान्यात नव्या पत्रकारांनी आभ्यास आसल्यासारखं दाखवलं तरी चाल्तंय म्हण्तो त्यो. नाईतरी कोण्च्याय चर्चा पाह्यल्या तरी आउटसोर्सिंगच जास्ती क्येल्येलं आस्तंय. चार-पाच लोकं बोलवायचे, त्यांना अधूनमधून चाबी द्यायची, कधी आपण अँकर हाओत ह्ये दाखवावं वाटलं तर मध्येच येखांदी काडी करायची, बाकी त्ये या बाजूनं त्या बाजूनं आपसात वाद करीत र्‍हात्येत. समारोपाला आपण तिसरंच काईतरी सांगून मोकळं व्हयाचं. प्रभ्याचा बाप म्हणायचा का, “प्रभ्या, माणसानं खोटं बोलावं पण रेटून बोलावं.”
प्रभ्या येरवी काई बापाचं आयकणार्‍यातला नाई, पण आसल्या गोष्टी मात्र हमखास आईकतो. फुल्ल आत्मविश्वासानं खोटं बोलताना बैल गाभण आशीपण ब्रेकिंग न्यूज द्येता येती ह्ये त्याले ठाऊक झालं आणि त्याची दुनियाच बदलून ग्येली.
प्रभ्याची दुनिया आजूक येका गोष्टीनं पार बदलली हुती. जमिनीचं आस्मान झालं आणिक आस्मानाची जमीन झाली इत्की बदलली. आता आशे बदल कामुन हुत्येत ह्ये तुमाले म्हाईती आसंलच. प्रेमात पडलं माणूस की त्याले विहीरबी खड्डा वाटते आणि समुद्र तर काय येक टांग टाकून डबरा वलांडावा तसा वलांडता येईल आसं वाटते, तसंच प्रभ्याचं झालं. जमाना नवा हये. आता काई जुन्या काळच्या वानी आभाळाचा कागुद, समुद्राची शाई आणि झाडाची लेखणी करून प्रेमपत्रं लिव्हण्याची जरूरत र्‍हाईली नाई. येक एसएमएस टाकला ‘आय लौ यू’ म्हणून का व्हऊन जातंय काम. ‘आय लव्ह यू टू’ म्हणून रिप्लाय आला तर दुधात साखर. नाहीतर आजून थोडी कोशीस करावी लाग्ते.
गावातल्या गावात आसंल तर लैच सोप्पंबी र्‍हातंय आणि आवघडबी. सोप्पं अशाले का वळख र्‍हातीच, शाळंपास्नं पोरंपोरी येकमेकांना वळखत आसत्येत.  आवघड अशाले का येकमेकांचे मायबाप आणि आख्खं गणगोतबी येकमेकांना वळखत आस्तंय. त्यात प्रभ्याचा दणका आजून न्यारा होता. त्याला आवडलेली सीताबाईची सायली वायल्या जातीची हुती आणि प्रभ्या वायल्या जातीचा. बदलापुरात कधीतरी भांडं फुटणार हितं त्ये फुटलंच आणि वावटळीचं वादळ हुणार आसं दिसू लाग्लं. गावातले गडी जमवाजमव करू लाग्ले का आपण बदलापुरात खाप पंचायतीची स्थापना करायची. त्याच्याशिवाय ह्ये तरणे सांड ठिकाण्यावर येणार न्हाईत. यांना येसण घातलीच पायजे.
ह्ये बायायच्याबी कानी ग्येलंच. गावात काय, घरात काय बायकांपास्नं कोण्ती गोष्ट लपून र्‍हाते का कधी?
“सखुबाई, आमी हे काय आयकून र्‍हईलो?” आस्मिता सखुबाईकडच्या नव्या सोफ्यावर ट्येकता ट्येकता तावातावानं म्हनली.
“हां… तुमच्या घर्चे आमच्या घर्चे समदे गडी पंचायतीच्या आफिसात जमल्येत. समद्या पक्षायचे. मोज्जून येकन येक गडी घराबाहीर पल्डाय.”सुरेखानं दुजोरा दिला.
“तुमचा नंदोई पुढाकार घियालाय म्हनं. सीताबायची सायली लवम्यारेज करायचं म्हणायली तर आसं बदलापुरात चाल्णार नाई म्हणायलेत. यायला मेल्याला म्यारेजनंतरबी लव कर्ता येत नाई आणि दुसरे आदीपासून करायलेत तर बगवना…” कुसुमनं बोटं मोडली.
“काय्ये… मी दोनचार दिवस तापानं आंग कणकणलं तर झोपूनच हये… गावात, घरात काय घडलं काई पत्ताच नाई… नीट सांग काय झालं त्ये…” सखुबाई म्हण्ली.
“सखुबाई… कशी काय झोप लागू शकते तुला?”
“आगं… ह्ये पुरुषलोक म्हणायलेत का गावात ‘खाप पंचायत’ स्थापन क्येली पाईजे. निस्ते आदेश नाई फतवेबी काडले पाईजेत. या बाया लई झपाट्यानं बदलायल्यात, त्यांना येसण घातली पाईजे.” आस्मितानं सांगलं.

सखुबाई पुन्ना इचारात पडली.
आता आसं काई करू नका म्हणलं की या बाप्यांना लग्गेच च्येव चडणार आणि हट्टाले पेटून त्ये नको म्हणलेलं आचूक करणार. यांना आडवावं कसं? तिनं आपल्या आज्जीचा चेहरा डोळ्यांपुढं आणला. टिकलीसंगट कपाळ चिमटीत पकडलं.
सगळ्या बाया श्वास रोखून गपगार हुत्या.
मग येकदम तिले हासायलेच आलं. म्हणली, “काळजी नुका करू. करूंदेत त्येंना ‘खाप पंचायत’ स्थापन. उद्याच्याले आपण समद्या बाया पंचायतीत जमू आणि ‘काप पंचायत’ स्थापन करू. आपणबी आदेश आणि फतवे काडू. हाय काय आन नाय काय? आपल्याले कोण रोखणार? त्ये धमकी द्येत्यात तर आपणबी धमकी द्येऊ का कापून काढू येकेकाचं… हाय काय आन नाय काय! लोकशाही हये…”
बायायचे चेहरे येकदम उजळले.

13. पुरुष सबलीकरण


प्रभंजनकुमार रणनवरे उर्फ प्रभ्या म्हणाला,”सखुबाई, तुम्ही काई फिकिरच करू नका. निचिंतीनं र्‍हावा.
मी तुमाले यादी करून द्येतो का बाया पुरुषांहून कशाकशात फुडे हईत.  समदी आकडेवारी हये माझ्याकडे.”
“ह्येतर मलापण ठाऊक हये.” ड्रिंकर टेलर म्हणला,”पहिलंछुट उदाहरण देयाचं तर डास!”
“आता डासांचं काय काढलंत दिनकरराव? म्हण्जे मला म्हाईतीये की बदलापुरात डास फार झालेत. गटारं उघडी हयेत. उकिरडे कचराकुंड्या सोडून सगळीकडे वाहून राहिलेत. डास, ढेकणं, झुरळं, उंदीर, चिचुंद्र्या सगळं वाढलंय. प्लास्टिकचा कचरा भरून भरून नाले बंद झालेत. जोशीबुवांची पाचलक्षणी गाय पोट फुगून आजारी पडली, तिचं ऑपरेशन केलं तर तिच्या पोटात संत्र्याएवढा प्लास्टिकच्या पिशव्यांचा गोळा निघाला..”
“फुटबॉलएवढा…” प्रभ्यानं दुरुस्ती केली.
“हे टीव्हीचॅनल नाहीये प्रभ्या, इतकं अति करून सांगायला. मी म्हणते डास हा काई मुद्दा हये का निवडणुकीत सांगायचा? लोक येड्यात काढतील आपल्याला. लोकांना काय आसं सांगायचं की निवडून आले की मी डासांचा नायनाट करणार.”
“निर्दालन… निर्दालन म्हणा सखुबाई. भाषा अजून सुधरत नाहीये तुमची.” प्रभ्या पुन्हा पचकला.
“तेच ते… मी काय आसं आश्वासन द्येणार का मी खुर्चीवर हये तवरोक बदलापुरात येकपण ढेकूण, झुरळ, उंदीर, पाल दिसणार नही! आपल्याला काय पेस्टकंट्रोलचा साईड बिझन्येस टाकायचाय का?”
“तसं नाई सखुबाई… मी सांगत हुतो का ते बायायचं कत्रुत्व… करुत्वत्र… नाई ते काय आस्तंय ते…”
“कर्तुत्व…!”
“हां… तेच ते. तर बायायचं ते पुरुषांहून मोठं… स्वारी… भारी… स्वारी… जास्तीचं कस्काय हये त्ये. म्हण्जे आता बगा… आपण म्हण्तो का डास चावला! तर आपण चूक बोल्तो. आपण म्हण्लं पायजे डास चावली! कामुन की नर डास चावत नस्तोय. माणसायले चावते, रगत पिते ती डासायची मादी. मलेरिया तीच पस्रवते, ड्येंग्यु तिच्याचमुळं हुतो. नाना पाटेकरला आदी म्हाईत आस्तं तर म्हणाला अस्ता की साली एक मच्छर आदमी को हिजडा बना देती हय! तर बाईची नारीशक्ती अस्ली र्‍हाते. ती मर्दायले हिजडा बी बनवू शकते चावून. मी कर्तो ना सखुबाई तुमचा प्रसार… नाई प्रचार…” ड्रिंकर टेलर झुलत झुलत म्हण्ला.
“प्रभ्या…” सखुबाई म्हण्ली, ” या ड्रिंकरला आदी उचला आणि बारमदी न्येऊन बसवा.
इलेक्शन हुईतो हा बारमधून भायेर येणार नाई याचा बंदोबस्त करा. इरोधी पक्षाच्या कुणाकडं आसं बोल्ला तर मला रक्तपिपासू म्हणायचे लोक याचं आयकून. उगा न मगा बगा माजा झगा.”
मंग संभ्या ड्रिंकरला ढोर हाकलावं तसं हाकलत बारकडं घ्येऊन ग्येला. सखुबाई इचार करत र्‍हाईली का आपल्या भाषणाचा मुद्दा काय बै आसावा? ह्ये महिला सबलीकरण जुनं झालं. तीन निवडणुकांपासून पुरुष उमेदवार सांगून र्‍हायलेत त्ये. त्यायचं आनुकरण आपुन कायला करावं? कत्टाळा आला आयकून.
तेवड्यात सोमवार्‍या चाय घिऊन आला. त्यानं पाह्यलं का त्याची बायकोबी मीटिंगीत बस्लीय. त्याचं टाळकंच सरकलं का आता बायकोच्या हातात चाय द्यायचा म्हणजे जास्तीच झालं तिच्या बायली.
तो आरबाळल्याचं सखुबाईच्या ध्यानात आलं आणि तिला मुद्दाच गवसला.
सखुबाई म्हण्ली, “सापल्डा मुद्दा. बायायचं सबलीकरण झालंय कदीचंच. त्ये जुनंबी झालं. आता माझा मुद्दा हये का या बदलापुरात पुरुष सबलीकरण होयाला होवं.”
सोमाच्या हातातला ट्रे भुकंप आल्यावानी थडाथडा उडू लागला.
 

भावेबाईंविषयी… ७५च्या निमित्ताने!


काल रात्री अगदी ठरवून जागत बसले बारा वाजेपर्यंत आणि भावेबाईंना ( पुष्पा भावे ) बरोब्बर बारा वाजता फोन केला. एक मिनीट इकडे नाही, तिकडे नाही. असले पोरकटपणे एरवी सहसा करत नाही, पण आज बाईंचा पंच्याहत्तरावा वाढदिवस. त्यांच्यासमोर पोरकटपणा नाही करायचा तर कुणासमोर करायचा?
बाईंचा आधी फार धाक वाटायचा. त्यामुळे त्या समोर येऊनही मी कधी धड बोलले नाही त्यांच्याशी, बराच काळ. पहिला संवाद झाला तो एका जाहीर कार्यक्रमात. मला मालशे फेलोशीप मिळाली होती आणि दत्तू बांदेकरांवर शोधनिबंध लिहिला होता. माझं भरपूर परिभाषा वापरून केल्या जाणार्‍या बोजड समीक्षेशी वावडं आहे. निबंधवाचनानंतर प्रश्नोत्तरं सुरू झाली. माझ्याआधीच्या निबंधवाचकाला एका विद्वान प्राध्यापकांनी ‘लिटररी’ रडवलं होतं. त्याचा ताण माझ्यावर आला होता. चर्चा सुरू झाली, मी जेमतेम उत्तरं देत होते. मग ते विद्वान उठले. आवेशपूर्ण रीतीने त्यांनी एकेका शब्दाचा किस पाडत प्रश्न सुरू केले. बोलूच देईनात. आपलं अर्धं वाक्य झालं की त्यांचा त्यातला शब्द उचलून उपप्रश्न येई. कुठल्या फ्रस्टेशनमधून लोक असे उख्खड वागतात कोण जाणे? बाईंनी त्यांना रोखलं. तिला पूर्ण बोलू द्या, असं सांगितलं. मी जे बोलले त्याला पूरक असं पुढचं मतही एका उत्तरावेळी त्यांनी सांगितलं. सगळं आटोपतंय तोवर बाई म्हणाल्या की मला एक प्रश्न विचारायचा आहे. माझी फाफलली. पण बाईंचा प्रश्न फार रोचक होता. बांदेकरांच्या विनोदात जो तमाशातला हजरजबाबीपणा दिसतो, ती तुलना मी ध्यानात घेऊन अजून काही लिहायला हवं होतं असं त्यांचं म्हणणं होतं. ‘मला हे सुचलं नाही’ याची कबुली मी दिली. मग त्यांच्याकडून तो मुद्दा नीट समजावून घेतला कार्यक्रम संपल्यावर. त्यांनीही जाण्याच्या घाईघाईत थांबून, वेळ काढून तो समजावून सांगितला. नंतर हा शोधनिबंध प्रकाशित करायचं ठरलं तेव्हा त्यात या काही नव्या चौकटी अ‍ॅड केल्या. मी काही त्यांची विद्यार्थिनी नव्हते, पण त्यांनी शिकवण्यात त्यानंतरही कधी हात आखडता घेतला नाही. पुढे मुंबई विद्यापीठात ब्र वर चर्चा झाली, तेव्हा बाई अध्यक्ष होत्या. पुस्तक अगदीच नवं होतं, मला असं बोलायची सवय नव्हती, तेव्हा मी काहीतरी तिरकस उत्तरं देऊन प्रश्न उडवून लावत होते; पण बाईंनी अध्यक्षीय भाषणात या अवजड प्रश्नांची तशीच अवजड उत्तरं दिली आणि माझी काही उडती विधानंही खोडून काढली. बाईंचा धाक अजूनही कमी झालेला नव्हताच. त्यानंतर अमर हिंद मालेतील व्याख्यानावेळी मी माईकचा ताबा घेतला आणि बाई आकस्मिक समोर बसलेल्या दिसल्या. पहिली पाचसात मिनिटं मी काय बोलत होते हे मलाही कळत नव्हतं. मनात चाललं होतं की आपण काहीतरी चुकीचे विचार मांडू आणि बाईंसमोर ओशाळं व्हावं लागेल. पण पुढच्याच सेकंदाला दुसरा व योग्य विचार सुचला की, ‘आपल्याच बाई आहेत. त्यांच्यासमोर चुकलो तर चांगलंच, त्या योग्य तेच सांगतील समजावून. हे दुसरं कोण करणार? अशी अभ्यासू, विचारी, थेट बोलणारी व कृतीशील माणसं आहेत कितीक?’ मग पेच सुटला.
जळगावला झालेल्या कवयित्री संमेलनाच्या बाई अध्यक्ष होत्या. संमेलन हे हौशानवश्यागवश्यांनी भरलेलं. मी आणि सुनंदा भोसेकर हताश बसून पाहत होतो. भर्जरी साड्या नेसून दागिणे घालून लग्नाला आलेल्या असल्याप्रमाणे वावरणार्‍या या बायका स्टेजवरून विद्रोहबिद्रोह यमकात गुंतवून ऐकवत होत्या. अस्सल असं मोजकंच असतं, ते ही होतं हे आमचं सुदैव. बाईंचं त्या दिवशीचं अध्यक्षीय भाषण अप्रतिम झालं. अनेक नवे मुद्दे त्यात होते. कविता हा प्रकार नव्याने उलगडत, कळतच गेला. कुठून आलो असा भाव होता चेहर्‍यावर तो अदृश्य झाला. ते भाषण मी जपून ठेवलं आणि त्याची अनेक पारायणं केली. कवितेविषयी, त्यानंतर स्त्रियांच्या कवितेविषयी बाईंनी जी मांडणी केली डोक्यातली जळमटं पुसून लख्ख प्रकाश टाकणारी होती. संध्याकाळी हॉटेलवर परतलो, तेव्हा कॅरिडॉरमध्ये बाई समोरच दिसल्या. मी बाईंना शब्दशः साष्टांग नमस्कार केला जमिनीवर नीट पालथं पडून पायांवर डोकं टेकवून. बाई संकोचून गेल्या होत्या. या संमेलनाच्या समारोपाचं जे भाषण बाईंनी केलं तेही अध्यक्षीय भाषणाइतकंच महत्त्वाचं आणि संग्राह्य होतं.
इथून पुढे मात्र धाक ओसरून बाईंविषयी निव्वळ प्रेम वाटू लागलं. क्वचित त्यांच्या घरी येणं जाणं होऊ लागलं. बाई उत्तम स्वयंपाक करतात. पोळ्या लाटतालाटता दुसरीकडे मनात व्याख्यानाची तयारी चांगली होते, असं गमतीनं सांगतात. हाताला विलक्षण चव. शेकडो पदार्थांची माहिती. त्यांच्या सजावटीपासून सगळी नजाकत. साधं कलिंगड कापून दिलं त्यांनी एकदा… खाताना म्हटलं, यात बिया कशा नाहीत? तर त्यांनी काट्यानं बिया काढूनच दिलं होतं सगळ्यांना. साधी गोष्ट आहे, पण स्वभाव कळतात अशा गोष्टींमधूनच. बाई गुंतलेल्या असतात, पण गुंतल्यासारखं दाखवत नाहीत; प्रदर्शन तर नाहीच कशाचं. उग्र वाटणार्‍या व्यक्ती आतून किती प्रेमळ, केअरिंग आणि जिव्हाळ्यानं ओतप्रोत भरलेल्या असतात हे त्यांच्या प्रत्येक भेटीतून ठसत गेलं नंतर.
त्यांच्या सामाजिक भूमिका, विचार हे माहीत आहेतच बहुतेकांना; पण व्याख्यानं हवेत विरतात. आजकाल काही लोक रेकॉर्ड करून ठेवतात थोडं काही, पण कमीच. बाईंनी लिहिलं अगदीच क्वचित पण व्याख्यानं अक्षरश: शेकड्यांनी दिली. ती रेकॉर्ड करून ठेवली असती तर केवढा ठेवा हाती लागला असता. बोलणार्‍या लोकांना लिहिण्याचा कंटाळा असतो, त्यांच्याकडून लिहवून घेतलं पाहिजे वा त्यांनी बोललेलं उतरवून घेतलं पाहिजे खरंतर.
गेल्यासाली इतक्या काळानंतर पहिलंच पुस्तक प्रकाशित झालं बाईंचं… ‘रंग नाटकाचे.’ जुने लेख होते. नाट्यसमीक्षेचे. या पुस्तकाला माधव वझेंची नेमकी प्रस्तावना आहे आणि वझेंनीच बाईंची मुलाखत घेतलेली आहे. बाईंच्या लेखनातले मायनस पॉइंटही त्यांनी समकालिन असल्यानं मोकळेपणाने मांडले आहेत. उदाहरणार्थ आपला वाचक हा सुजाण व ज्ञानी असेल हे गृहीत धरून बाई कसे देशविदेशातले संदर्भ देत मांडणी करतात.
या पुस्तकात नेमके तीन महत्त्वाच्या नाटकांवरचे लेख संपादकीय गोंधळात वगळले गेले. घाशीराम कोतवाल, सखाराम बाइंडर आणि महानिर्वाण. पुढच्या आवृत्तीत ते वाचायला मिळोत.
रत्मागिरीच्या साहित्य संमेलनावेळी बाळ ठाकरेचं नाव व्यासपीठाला देण्याच्या मुद्यावरून वाद झाला तेव्हा बाईंनी प्रथम ठाम भूमिका घेतली विरोधाची. मी, प्रज्ञा पवार असे अजून काहीजण मग त्यात उतरलो. बाईंचं म्हणणं होतं, ‘आता तुम्ही लोकांनी आधी बोललं पाहिजे. सुरुवातीलाच ठाम भूमिका घेतल्या पाहिजेत.’ ते पटण्याजोगं होतंच. त्यावेळी संजय राऊत बाईंविषयी वेडंकुडं बोलला की यांना आता कोण ओळखतो आणि प्रसिद्धीसाठी या हे विरोधबिरोध करतात. त्यावेळी पहिल्यांदाच मी स्वतःहून आय.बी.एन. लोकमतमध्ये फोन करून सांगितलं की, ‘मला संजय राऊतला उत्तर द्यायचंय.’ ते मी दिलं. बाई कोण हे माहीत नसेल तर ते त्यांच्या अज्ञानाचं प्रदर्शन करताहेत, म्ह्टलं. विरोधात बोलायला मुद्दे नसले की प्रसिद्धीसाठी वगैरे मुद्दे किंवा चारित्र्यहनन करणं हे सोपे मार्ग अवलंबतात बुद्धीनं बुळे असलेले लोक.
रात्री बाईंना विचारलं की, “काय उद्याचा कार्यक्रम?”
तर बाई म्हणाल्या की,”काही नाही. जुने मित्रमैत्रिणी आता राहिले नाहीत, अनेक गेले त्यामुळे तेव्हाप्रमाणे गप्पांचा अड्डा जमत नाही आताशा. बाकी परवा मी दौर्‍यावर निघतेय, तर ती तयारी करायची आहे.”
गेल्याच आठवड्यात बोलत होतो, तेव्हा बाई म्हणालेल्या की एखाद्या चांगल्या पुस्तकाचा अनुवाद करून पहावा असं मनात आहे. दे एखादं पुस्तक!” आणि मी चकित झालेले की या वयात, इतक्या व्यापांमध्ये बाईंनी उत्साहानं अजून एक काम ओढवून घ्यावं. मग पुन्हा एकदा स्वतःच्या ‘उपस्थितबुद्धी’चं हसू आलं आणि जाणवलं की, ‘या वयात’ हा शब्दप्रयोगच बाईंच्या बाबत वापरणं किती गैर आहे. शंभरी गाठतील तेव्हाही बाई एखाद्या व्याख्यानाची तयारी करत असलेल्या दिसतीलच खात्रीने.

१४०. दु:खाची चव


डोळ्यांमधून टपकलं
ते
रक्त
होतं
रंगाधळा आहेस का
पाणी म्हणायला?चव घेऊन बघ म्हणावं
तर रक्तही खारं असतं
व अश्रूही
आणि मुळात
माझ्या
दु:खाची चव तुला
कशाला द्यायची?

वास
येतो रक्ताचा, अश्रूंचा नाही येत
आणि आकार
सारखाच असतो साधारण
दोन्हींचा

मिसळून गेलेत दोन्ही
तर कसं ओळखणार तू?

ठेव सूक्ष्मदर्शकाखाली.

१३९. ईश्वराची स्वप्नं


एका स्वप्नात तू होतास
एका स्वप्नात मी
ईश्वराला पडलेली दोन
स्वतंत्र स्वप्नं होतो आपणजागेपणी तो गोंधळला आठवून
आणि बांधली एक सैल गाठ
आपली
खेळत नव्हता तो आपल्याशी
पण कळत नव्हतं त्यालाच काहीआता आपल्यावर होतं ठरवणं
की गाठ गच्च पक्की करायची
वा सोडून द्यायची
वा ठेवायची अशीच सैल
ईश्वराचा निर्णय म्हणूनआपल्याला माहीत होत्या मर्यादा
ईश्वराच्या
पण स्वप्नं असतात अमर्याद
ईश्वराहूनही
हेही माहीत होतं
म्हणून तर ईश्वरानं पाहिलं
आपलं स्वप्नं

निळ्या धुक्याच्या दरीत
दगडी कोरीव मंदिरात
आपण जोडीने फुलं वाहिली
तेव्हा दचकला ईश्वर
की आपल्या नजरेसमोर नव्हताच तो
नव्हती त्याची दगडी पावलं
आपण फुलं दिली ती
आपल्या विश्वासाच्या तळहातावर
जन्मांचं आश्वासन देत एकमेकांना

भेटूच
पुढच्या जन्मात
एकच स्वप्न बनून
ईश्वराला चकित करत पुनःपुन्हा.

१३८. फाल्गुन


पाकळ्यांनी उन्हं पिऊन घेतलेली
पांगार्‍याची अंगारफुलं
घेऊन ये पुन्हा
माझ्या मोकळ्या केसांत खोवायला
शिलगलेल्या शरीरांनी
बनून जाऊ एकच आग
धगधगत्या ज्वालांच्या विळख्यांनी
आवळूनकवळून घेणारी

उजळून जाऊ आपण
पेटेल आसमंत
ठिणग्या उडत राहतील गाण्यांच्या
वार्‍यावर दूरदूरपर्यंत नाचत
शेकडो बासर्‍या वाजू लागतील
वेळुबनातून हाका मारत
ये ना… ये ना… ये ना रे….

मग राख झालो तरी बेहत्तर
या फाल्गुनात!

12. लई आळशी पुरुष


“लौ यू म्हण्णं, प्रपोज करणं, टेडी भ्येट देणं, ल्हान लेकरायवानी चॉकलेटं खाऊ घालणं, मिठ्या मारणं आस्ले सगळे दिवस फ्येब्रुवारीतच काऊन घातले जात आस्तील माय? तरी बरं का ल्हान म्हयना आस्तोया… नाईतर आजूक कस्ले कस्ले दिवस घातले आस्ते यायनी कोण जाणं?”  माझी नणंद राधिका उर्फ शर्मिला नवर्‍याच्या आयफोनवरून बोलत हुती. ( तीच ती, जिचा नौरा म्हण्जे आमचे सुरेशभावजी मनसेत हयेत आणि नाक्यावर ज्यांचं आयफोन घेतलेला हात उचलेलं फ्लेक्स डकवलं हुतं, ज्ये फ्लेक्स आता नको त्या जागी चिरफाळलं ग्येलंय आणिक त्ये काडायच्या आदी तिथं आप्लं दुसरं कस्लं फ्लेस लावायचं याची आयडिया जावई शोधून र्‍हाइलाय. )
वन्संच्या बोलण्याचा मी लै इच्चार क्येला. ट्यूब काई प्येटना. 
कोणाले इच्चारलं तर लोकं  आप्ले काईच्याबाई सांगत्यात. माझी मैत्रीण सुलभा म्हणे का, “बराबर नऊ मयन्यांनी १४ नोव्हेंबरला बालदिन साजरा करता यावा म्हून लोक १४ फ्येब्रुवारीले प्रेमाचा दिवस साजरा करत्यात!”
कोणाचं काय तर कोणाचं काय… 
उत्तरगित्तर सापडलंच नाई,  उल्टं आजूक येक सवाल डोक्यात उगवला. राधिका वन्संना म्हणलं, “सगळ्या गोष्टींचे दिवसच कामून घालत्येत लोक? ज्या गोष्टी रातच्याले करायच्या राहत्यात, त्याचे बी दिवसच? आसं कामून आसंल बाई? आमक्याची नाईट, तमक्याची नाईट आसं कामून म्हणत नसतील?”
तर आमची नणंदबाई म्हणली का,”वयनी, तू लैच चावट बोलून र्‍हायली. येका रातीला आमका, दुसर्‍या रातीला तमका… म्हणजे काय म्हणायचंय काय तुला?”
मी म्हणलं,”तसं नाई ग बाई. आता रोज डे आस्तंय ना…”
“रोज तर डे बी आस्तो आणि नाईट बी आस्ती..”
मी कावलेच. काय बाई करावं या बाईच्या आकलेचं… कशीकाय ही सहावी नापास पर्यंत तरी शिकली म्हण्ते मी. म्हणलं, “लै फाटे फोडू नका राधिकावन्स तुमी. रोज म्हण्जी रोज नाई, रोज म्हण्जे गुलाब. गुलाबाचा दिवस. आता गुलाब दिवसा उगोतो, तर दिवस ठीकाय… पण मग येखांदी रातराणी नाईट कामून नस्ती म्हणते मी?”
तर तिचा नौरा, म्हणजे आमचे सुरेशभावजी म्हण्ले,”वयनी, नाईट बी आस्ती. तुमाले नाई म्हाईत. गटारी काय दिवसा आस्ती काय? ती ब्येवडा नाईटच आस्ती.”
येक तर आसं कोणी दुसर्‍यायचं बोलणं आईकल्येलं मला आवडत नाई. पण आता ह्ये पडले जावई. कशी कुटकुट करणार यांच्याकडं? बायाबाया बोलतोय म्हण्लं का ओपनली काईबी बोलत अस्तो आपण. त्ये बाप्यायनी आयकायचं काय काम? 

पण ह्ये टीव्हीवरच्या सिरियली बगूबगू लई बिगडल्येत बाप्येबी. चोरून काय आयकतेत, सोंशय काय घ्येत्येत, कुचूकुचू काय बोलत्येय… घरात सजूनधजून बसणं काय बाप्यायचं काम र्‍हातंय का? लग्नाचा येक दिवस सूट नाईतर शेरवानी घालायची म्हटलं तरी यांना घाम फुटतो… म्हण्जे बाकी काई म्हणायचं नाई मला… आपल्याकडली हवाच तसली आहे तिला त्ये तरी काय करणार? पण टीव्हीवरचे बाप्ये दिवसरात्र लग्नघर असल्यावानी सजून बसत्येत हॉलमध्ये आणि बायायसोबत कुचुंद्या करत्येत. 
त्ये बघून बघून बाकी पुरुषांनाही आपण घर-घर खेळत बसाव वाट्टे कामधाम सोडून.
मी राग आवरून म्हण्लं,”ह्ये बरं आठवतं सुरेशभावजी तुम्हाले. काई चांगलंवांगलं आठवना?”
तर त्ये म्हणले,”मी जरा येगळ्याच चिंतेत हये. दुसरं काय आठवणार?”
आता यायले कस्ली बाई चिंता लागली आसंल?
कळंना. तर त्येयनी राधिकाले कुत्र्याले जरा फिरवून आण म्हणून बाह्येर धाडलं आणि खुसखुसत मला इचारलं,”वयनी, दादाने तुमाले काई गिफ्टबिफ्ट देल्हं का? देल्हं आसंल तर काय देल्हं सांगता का? व्हॅलेंटाइन डे हये, तर गिफ्ट काय द्येणार… आसं राधिका आडून आडून इचारत हुती. शिवसेनेत आस्तो तर
व्हॅलेंटाइन डे ला इरोध आहे म्हून सुटका झाली आस्ती… मनसेत आलो आणि अडकलो. आता तुमीच काय त्ये सांगा.”
आता यायला काय सांगणार आप्ली ट्राजेडी का काय म्हणतात ती? 
आमचं ध्यान आणि गिफ्ट आणणार आणि त्ये बी व्हॅलेंटाइन डे लक्षात ठीऊन? यांले माझा वाढदिवस ध्येनात र्‍हात नाई, लग्नाचा वाढदिवस ध्येनात र्‍हात न्हाई… आन त्यो कोण व्हॅलेंटाइन का कोण, त्याच्या प्रेमाचा दिवस ह्ये लक्षात ठिवणार? आभाळ कोसळंल, जमीन हादरलं, दुनिया इकडची तिकडं होयल; पण यांना प्रेमातलं प सुदिक कळायचं नाई कधी.
मी उदास व्हऊन म्हण्लं, “काई काई पुरुष लई आळशी असत्यात सुरेशभावजी. खरंच हां. आता आमचंच ध्यान बगा… फ्लाइंग किस द्येतंय….”
सुरेशभावजी चितागती व्हऊन म्हण्ले,”आसं कामून वयनी? तुमी काय तंबाखू खाता का दारू पिता तोंडाले वास यियाला?”
भडकाच उडला की मग तर माझा. म्हण्लं,” ही सखुबाई येकदम नीटनेटकी हये. अख्ख्या बदलापुरात माझ्यासारखी बाई नाई. आता माझ्या सासू नं. ३ चा देखणेपणात अपवाद. त्ये सोडा. त्यामुळं नस्ते आरोप नगा करू सुरेशभावजी… उगं पुर्षांच्या आळसावर पांघरूण घालायले यिऊ नका. उंदराले मांजर साक्षी बनून गंजुभावजी येत्यात तसे. सगळे पुरुष म्येले सारखे. याला झाकावं आणि त्याला काढावं.”
आणि  आपटला फोन दाणकन. बघत्ये तर काय… आमचा आरुण गवळी, म्हण्जे आमचे सासरेबुवा सासू नं. ३ साठी बदामांच्या नक्षीचा लाल चमचम चमकणारा कागदात गुंडाळलेला गिफ्टबॉक्स घिऊन सासू नं. ३ च्या ब्येडरुमीकडं निघाले हुते तोर्‍यात परफ्युम फवारून.

पुन्हा एकदा स्वप्नं…


मनावरचं ओझं जितकं कमी होईल तितकी झोपेत पडणारी स्वनं कमी होतात. सुषुप्तीत स्वप्नं पडत नाहीत, ती पडतात अर्धजागृतावस्थेत. डीपस्लीपचा – गाढ झोपेचा काळ वाढला की स्वप्नं कमी होतील.
पण मला स्वप्नं पडू नयेत असं वाटत नाहीये. जागेपणी त्रास होतो तो फक्त वाईट स्वप्नं सविस्तर, तपशीलात आठवतात त्याचा; चांगल्या स्वप्नांचा त्रास होत नाही. मध्यंतरी काही स्वप्नं लिहिली, त्यानंतर ठरवलं की सगळीच स्वप्नं नोंदवून ठेवायची.

एका स्वप्नात धुक्याने वा पावसाने भरलेली खोल गहिरी दरी असावी तशी फुलपाखरांनी भरलेली दरी दिसली. अदभुत दृश्य. अविस्मरणीय. पंख फुटलेले रंग आणि पंखांच्या हालचालींचा सू़क्ष्म ध्वनी… जो ऐकू येतच नाही खरंतर, पण जाणवतो. उंच डोंगरसुळके, गडद निळेकरडे आणि त्यात ही लाखो फुलपाखरं…
तो अख्खा दिवस नादिष्ट होता.

दुसर्‍या स्वप्नात माझ्या घरासमोरच्या अंगणात खुर्च्या टाकून मी आणि दादा ( विरुपाक्ष कुलकर्णी ) बोलत बसलो होतो शांतपणे. समोर एक दलदलीचं वर्तुळ तयार झालं होतं जिवंत खदखदत्या चिखलाचं. त्या मातीला उकळी फुटली होती आणि चिखलाचे बुडबुडे उमलत-फुटत होते. वर्तुळाचा विस्तार वाढत जात होता. मी दादांना सांगत होते की,”हे वाढत चाललंय आणि लवकरच एकेदिवशी ही दलदल मला गिळून टाकणार आहे. मी यात नष्ट होणार आहे.”
स्वप्नात दादांनी त्यावर काहीच उत्तर दिलं नाही; म्हणून मग जागेपणी फोन केला. म्हटलं : सांगा आता काहीतरी. .
मग जो संवाद झाला त्याचा हा सारांश.

रात्री झोपण्याआधी टीव्ही, कॉम्प्युटर, पुस्तक काहीतरी नजरेसमोर असतं. ते मिटवताच लगेच झोपायचं नाही. थोडावेळ पद्मासन घालून बसायचं. दीर्घ श्वास घ्यायचे. श्वासांची संख्या कमी होते. धपापणं कमी होतं. भरकटणारे विचार, भावना शांत होतात. विचारांचा वेग, आवेग, संख्या कमी होत जाते. मग एका क्षणी जगापासून तुटल्याचा अनुभव येतो, तेव्हा झोपायचं. शांती मनात, देहात पसरते आणि आपण हळुवारपणे झोपेत शिरतो.
या झोपेची क्वालिटी फार चांगली असते. मग थोडी झोप मिळाली तरी ताजंतवानं वाटतं. मानसिक ताण कमी झाले की शरीराचं काम कमी होते. अन्यथा केमिकल लोचे वाढल्याने शरीराला बिचार्‍याला जास्त राबावं लागतं आतल्या आत. शरीराचं हे अनाहूत काम कमी झालं की ते बाकी कामं मस्त वेगानं करू लागतं. एकुणात चांगल्या झोपेचा शरीरावर चांगला परिणाम होतो.
हे लगेच जमेल असं नाही. करून पाहत राहायचं चिकाटीने, मग रिझल्ट्स मिळतात.

अजून काही उपाय माझ्याजवळ पूर्वानुभवातून होते.

फिरायला जातो तेव्हा आपण नकळत क्लॉकवाइज चालतो. घड्याळाचे काटे फिरतात त्याच दिशेने. तर संध्याकाळी / रात्री चालतो तेव्हा अँटीक्लॉकवाइज चालायचं. चांगली झोप लागते.

माझ्या मित्राने एक काचेचा क्युब दिला होता आणून कुठल्याशा देशातून. तो ‘ऑन’ केला की त्यात फुलपाखरं उडू लागतात. रात्री अंथरुणात शिरण्याआधी तो ऑन करून ठेवायचा… त्या फुलपाखरांकडे पाहताना झोप लागते नकळत.

अशा बर्‍याच गोष्टी…

मितालीचे किस्से


मितालीचे बरेच किस्से आहेत. त्यातला अजून एक.
एकदा हैद्राबादला माझ्या मुलाखतीचा एक कार्यक्रम होता. कार्यक्रम सुरु होण्याच्या वेळेत मी स्टेजवर जाऊन बसले.
मुलाखत घेणार्‍यांना विंगेत कुणीतरी काहीतरी सांगत होतं, त्यामुळे थोडावेळ स्टेजवर मी एकटीच होते. त्याचा ताण येऊन मिताली तिच्या बाबाला म्हणाली,”बाबा, मावशी बघ एकटीच स्टेजवर बसली आहे आणि घाबरून रडतपण नाहीये.”

000

माझी भाची मिताली छोटी होती, तेव्हा तिने मला एका स्वतः बनवलेल्या बुकमार्कवर ‘पत्र’ लिहिलं होतं.
ते तिनं लिहिलेलं पहिलंच पत्र. कुणाचीही मदत न घेता उत्स्फुर्तपणे मराठीत लिहिलेलं. ती हैद्राबादला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत असताना तिला देवनागरी कसं लिहिता आलं हे सगळ्यांना पडलेलं कोडं होतं. मग तिनं खासगीत मला सांगितलं होतं की ती मराठी पेपर आणि मराठीतली लहान मुलांची पुस्तकं वाचत असते, तर वाचतावाचता तिची तीच लिहायलाही शिकली.
तर पत्र असं होतं…

मितालीची मावशी
तू सुट्टीत खूप दिवस पुन्हा राहायला ये.
मावशीची मिताली.

लहानच राहावं असंच, मोठं होऊच नये.
मोठं झाल्यावर समजतं की मायने खोटे असतात… पत्रंही फिजूल.

लघुतमकथा २६ : खेळ


उंदराचं एक लहानसं पिल्लू आपल्या आवाक्यात आलेलं दिसलं तसं आधी बोक्याच्या तोंडाला पाणी सुटलं. याला कसं पकडायचं, कसं मिळवायचं, कसं मारायचं, कसं खायचं, याची चव कशी असेल, याच्यामुळे माझं पोट कितीवेळासाठी भरेल – असे अनेक प्रश्न त्याच्या मनात वेगानं सरकून गेले. तसं पोट भरलेलं होतं, घाई करण्याचं काही कारणच नव्हतं. मजेनं, सबुरीनं घेता आलं असतं. नव्याची मजा निराळीच असते. तो अनुभवी व सराईत शिकारी होता आणि सावज नवंच असतं. जो जीव नवा नसेल तो इतक्या सहजी सावज कसं बनेल? बोक्याला हसू आलं. डोळे बारीक करून तो पाहू लागला. काहीतरी वेगळं आहे, त्याला जाणवलं; पण काय ते कळलं नाही. उंदीर चुकून आलाय इथं की हाकललंय त्याला कुणी इकडे आणि परतीच्या वाटा बंद केल्यात? धपापत नाही म्हणजे धावत आलेला नाही एखाद्या संकटातून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी. चुकूनच फिरत आलेला असणार. त्याच्यात वेगळं काय ते बोक्याला आकस्मिक कळलं. उंदीर त्याच्या नजरेला नजर भिडवून थेट बघत होता. मरणार आहेच हा, पण मी याला खेळवून-खेळवून मारेन. बोक्यानं ठरवलं.
बोक्यानं उंदराला विचारलं, “फ्रेंड्स?”
उंदरानं मान डोलावली?
“खेळूया?” पुढचा प्रश्न.
उत्तरादाखल उंदरानं धावायला सुरुवात केली.
बोका त्याच्या मागे धावू लागला. चकवाचकवी, लपाछपी सुरू झाली. बोलायचं, अबोला धरायचा. भांडायचं, पुन्हा बट्टी करायची. ओझरता स्पर्श व्हायचा, पण बोका उंदराला न पकडताच सोडून द्यायचा. उंदीरही सुटल्यासारखं करायचा. ‘बघ, मी तुला नष्ट करू शकतो, पण सोडतोय.’ बोका मनात म्हणायचा. उंदीर मनात काहीच म्हणायचा नाही, नुसतं खेळवून घ्यायचा. बराच काळ ते खेळत राहिले. त्यांच्या खेळाचं दुनियेला आश्चर्य वाटत राहिलं.
मग एकदाचा बोक्याला उंदराचा कंटाळा आला. बोका मनात म्हणाला,’योग्य वेळ येताना दिसतेय. संधी मिळताच आता झडप घालेनच.’
त्याचवेळी उंदीर एका भिंतीशी स्वतःच्याच आतल्या जुन्या जखमेचा स्फोट होऊन फुटला.
बोका स्तब्ध होऊन पाहत होता.
उंदीर त्याला म्हणाला, “थँक्स. मजा आली खेळवून घ्यायला. खरं म्हणजे खेळवून घेणं खेळवायला. एरवी कंटाळलो असतो शेवटच्या दिवसांत.”- गोष्ट सांगून ती समोरच्या खुर्चीतून उठून निघून गेली, तेव्हा त्याला वाटलं की किती विचित्र आणि विक्षिप्त बाई आहे ही? पण म्हणून तर तिला खेळवायला मजा येतेय. खेळवूया अजून काही काळ.