6. तिची स्वप्ने – २


वाघ नष्ट होताहेत.
झपाट्यानं घसरते आहे त्यांची संख्या
आणि हे निश्चितच काळजीचं कारण आहे.
नुसती चर्चा फिजूल आहे आता. काही
कृती केली नाही, तर दिसणार नाही
वाघाचं नामोनिशाणही
कुठल्याच जंगलात.
फक्त झू मध्ये दाखवावा लागेल वाघ मुलांना.
जंगलं नष्ट होताहेत
हे ही एक कारण आहे वाघ नष्ट होण्याचं
माणसांना हवे आहेत रस्ते, धरणं, कारखाने,
आणि अर्थातच घरं, शाळा,
थिएटर्ससुद्धा.
हवी आहे त्यासाठी मोकळी जमीन
जिच्यावर जंगलांनी अतिक्रमण केलंय
शतकानुशतकं
आणि अर्थातच वाघांनीही.
वाघनख गळ्यात घातलं की शक्तिमान होतो पुरुष
प्रत्येक संकटाला सामोरं जाण्यासाठी;
वाघाच्या सुळ्याचा ताईत दंडावर बांधताच
संरक्षण करू शकतो आपल्या मालमत्तेचं
मालमत्तेत स्त्रियाही आल्याच!
त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे
वाघाच्या मांसाचं सूप प्यायलं की
पौरुष्य वाढतं पुरुषाचं.
नाहीच जमलं यातलं काही तरीही निदान
व्याघ्राजीन तर नक्कीच उपयोगी पडतं
ध्यानधारणेला बसण्यासाठी.
तिला कळत नाही महत्त्व या गोष्टीचं
तिला स्वप्नात दिसतात शेकडो वाघ
चपळ, झेपावणारे, भेदक नजरेचे.
आणि  एखादा मनभावन
शांत दमदार चालीने चालणारा
जंगलातला पाचोळा तुडवत जाणारा
पट्ट्यापट्ट्यांचा वाघ, ज्यावर
तिला स्वार व्हावंसं वाटतं
निदान स्वप्नात तरी
तिला वाटत राहते काळजी, की
वाघ नष्ट होताहेत…
आता दुर्गादेवी कोणत्या वाहनावरून येईल
राक्षसांचा वध करण्यासाठी?
                  ०००

( छायाचित्र : श्री. अरविंद तेलकर यांच्याकडून साभार )

3 thoughts on “6. तिची स्वप्ने – २

  1. शेवट एकदमच मस्त.

    “तिला वाटत राहते काळजी, की
    वाघ नष्ट होताहेत…
    आता दुर्गादेवी कोणत्या वाहनावरून येईल
    राक्षसांचा वध करण्यासाठी?”

    खूप छान!

    Like

  2. धन्यवाद कविताजी. आपल्या कवितेला कवितेतूनच प्रतिक्रिया योग्य ठरली असती. सकाळी आपलं बोलणं झाल्यापासून उसंत मिळेल तशी कविता करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु, गद्य माणसाने पद्यात शिरू नये, असं म्हणतात ते काही खोटं नाही. अखेर नाद सोडावाच लागला. खरंच कविता छानच आहे. राजकीय नेत्यांसह चोरटे शिकारी आणि सामान्य नागरिकांच्या मनात अशी भावना निर्माण झाली तरच वाघ वाचण्याची शक्यता आहे.
    अरविंद तेलकर, पुणे

    Like

Leave a comment