Tag Archive | कविता

जैसा अमृताचा निर्झरु


काही पत्रं फाडून टाकल्यानंतरही जशीच्या तशी लक्षात राहतात, मेंदूने स्कॅन करून ठेवलेली असतात जणू… शंकर वैद्यांची पत्रं तशी होती. आज पहाटे पाच वाजता शुश्रूषा रुग्णालयात सरांचा मृत्यू झाल्याचं समजलं आणि त्यांच्या चेहर्‍यापाठोपाठ आठवलं ते त्यांचं लफ्फेदार अक्षर. कागदावरचा शाईचा निळसर हिरव्या दागिनाच जणू. सर दीर्घ पत्रं लिहीत. काही पत्रं काही दिवस वा एखाद-दोन महिनेही सुरू राहत. त्यावर ते पुढची तारीख घालत आणि त्यावेळच्या बदलत्या मूडनुसार पुढचा मजकूर लिहीत. एकदा कुसुमाग्रजांच्या कवितेबाबत असंच त्यांनी मध्येच दीडेक पान लिहिलं, नंतर ते एका लेखात अ‍ॅड करण्यासाठी परत मागवून घेतलं. सुरुवातीची पत्रं ही पत्रोत्तरं होती आणि नंतर आमची छान मैत्री झाली म्हटल्यावर स्वतंत्र पत्रंही येऊ लागली त्यांच्याकडून. सुरुवातीची नांदेडच्या माझ्या वडलांच्या घरच्या पत्त्यावर, मग औरंगाबादच्या आर्टस्कूलच्या पत्त्यावर, मग लग्न होऊन ठाण्याला आले तेव्हाचा तो पत्ता, मग कळवा, मग वसई… माझी जितकी घरं बदलली, त्या प्रत्येक पत्त्यावरची सरांची पत्रं होती. थोडक्यात विद्यार्थीदशेपासून ते आता मी पन्नाशीच्या जवळ आले तोवर प्रत्येक टप्प्याचे ते साक्षीदार होते. आदर, आपुलकी, विश्वास… असं सगळं अत्यंत सहज स्वाभाविकपणाने आमच्या नात्यात होतं. पुढे मी सरोजिनी वैद्यांसोबत काम करू लागल्याने हे नातं काहीसं बदललं आणि घरगुती स्पर्शही आला त्याला.
शेकडो आठवणी आज जाग्या झाल्या आहेत.
मी सरांना पहिल्यांदा भेटले तेव्हा माझं वय अवघं सतरा वर्षे होतं. कविता भरपूर वाचत होते आणि लिहिणं मात्र अगदीच किरकोळ व काहीसं हौशी पातळीवरचं होतं. त्यात व्यक्त होण्याच्या निकडीहून अधिक शब्दांशी एखाद्या खेळण्यासारखं खेळत बसण्याची मजा वाटत असणं होतं. सर एका कार्यक्रमासाठी नांदेडला आले होते. आम्ही काहीजण त्यांच्या स्वागतासाठी रेल्वेस्टेशनवर गेलो होतो. स्टेशनमधून बाहेर पडून आम्ही एका कडुनिंबाच्या मोठ्या झाडाखाली थांबलो. येईपर्यंत त्यांनी आमची प्राथमिक ओळख करून घेतली होती. आता अजून काय बोलणार? मग सरांनी हिवाळ्याविषयी बोलायला सुरुवात केली. हवेत छान गारवा होता. मग ज्याखाली उभे होतो त्या कडुनिंबाच्या झाडाविषयी ते सांगू लागले. त्याची कातरलेली पानं कशी दिसतात, त्या पानांवर हिवाळ्यात धूळ साठल्याने त्यांचा रंग कसा बदलतो… असं काहीबाही. मला त्या निरीक्षणांमधल्या बारकाव्यांची गंमत वाटत होती. नजर दृश्यांकडेही होती आणि शब्दांकडेही. मला पहिल्यांदाच जाणवलं की, हे सगळंच आपल्याला ‘दिसत असतं’, पण आपण त्याकडे ‘बघत’ नाही. आपला आसपास, आपला परिसर आपल्या कवितेतल्या प्रतिमांचं रूप घेत नाही. आपण काहीतरी उपरं, इतरांच्या अनुभवविश्वातलं, त्यांनी लिहून ठेवलेलं, त्यांच्याच पद्धतीने लिहितो आहोत. आणि हे काही बरं लक्षण नाही. असं लिहिण्यापेक्षा न लिहिणं चांगलं. व्यक्त होण्याची निकड असेल तर लिहावं, अन्यथा लिहू नये!
यानंतर कवितेकडे, एकूणच लेखनाकडे पाहण्याची माझी नजर बदलली. पुढे मुंबई आकाशवाणीवर झालेल्या माझ्या एका कवितेविषयीच्या मुलाखतीत मी हा किस्सा सांगितला. रेकॉर्डिंगहून परतल्यानंतर सरांना फोन करून सांगितलं की, “तुमचा उल्लेख आहे म्हणून ऐका जमल्यास.”
सर म्हणाले,”माझ्या उल्लेखाचं राहू दे. तुझ्या कवितेचं आहे म्हणून नक्की ऐकेन.”
ऐकून सरांचा फोन आला. म्हणाले,”हे गमतीचं आहे. पण असं आहे बघ पाण्याचा एखादा थेंब पन्हाळीवरून खाली ओघळतो आणि अगदी त्याचवेळी एक सूर्यकिरण त्याला छेदून जातो. मग तिथं ही चमक निर्माण होते. थेंब महत्त्वाचा, तसाच सूर्यकिरण महत्त्वाचा आणि ती अचूक साधलेली वेळही महत्त्वाची. मी हे साधं निरूद्देश्य बोलत होतो, त्यावेळी ऐकणारी काही तू एकटी नव्हतीस, पण बाकीच्यांपर्यंत ते पोचलं नाही, तुझ्यापर्यंतच पोचलं. असं का? तर ती क्षमता तुझ्यात आहे म्हणून.”
पत्रांमधून कशाविषयीही संवाद चाले असा. औरंगाबादमधले डोंगर, आमचं आर्टस्कूलमधलं काम, वाचत असलेली पुस्तकं. मध्येच त्यांच्यातला शिक्षक जागा होई आणि ते अभ्यासाचं महत्त्व इत्यादीही सांगत. माझा परीक्षेचा निकाल काय लागला इत्यादीही मी त्यांना कळवत असे. नवं घर घेतलं तेव्हा, ‘वारली लोकगीते’ हे माझं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं तेव्हा, असे केव्हाही फोन केले जात. सरांकडे लहान मुलांसारखी अमाप उत्सुकता होती. पुस्तक आलं की त्याचं मुखपृष्ठ कसं आहे, रंग कोणते इत्यादी ते तपशिलात विचारत. त्यांचा एक पेस्टल रेड कलरचा शर्ट होता. तो मला फार आवडायचा. मग ते गमतीनं म्हणायचे की, “तुझ्याकडे येताना तोच शर्ट घालून येईल.”
सरोजिनीबाई वैतागून म्हणायच्या, “पुरे झाला फाजीलपणा. हे काही बोलण्याचे विषय आहेत का?”
पण आमचे बोलण्याचे विषय बहुतांशवेळा इतके लहान लहान असायचे. एक विषय तेवढा आम्ही दीर्घकाळ बोलत राहिलो – स्वप्न! आम्हां दोघांनाही स्वप्नं खूप पडत असल्याने आणि ती सविस्तर आठवतही असल्याने त्यांची देवाणघेवाण व्हायची. त्यातून अर्थ शोधले जायचे. त्या निमित्तानं काही आठवणी निघायच्या.
सर एकदा घरी आले, तेव्हा मी विचारलं, “खाण्यासाठी काय बनवू? तुम्हाला काय आवडतं?”
सर म्हणाले, “शिरा कर. मला आवडतो. आणि करणार्‍यालाही सोयीचा असतो. गंमत अशी की हा पदार्थ हवा तितका गरीब आणि हवा तितका श्रीमंत बनवता येतो. अर्थात फार श्रीमंत बनवू नकोस आज, जरा मध्यमवर्गीयच असू दे.”
सरोजिनीबाईंबाबत आधी फार धाक वाटायचा. नंतर त्यांच्यासोबत राज्य मराठी विकास संस्थेत मी काम करू लागले तेव्हा तो नकळत नाहीसा झाला आणि त्याची जागा आदरयुक्त प्रेमाने घेतली. बाईंकडून मी असंख्य गोष्टी शिकले. अगदी लहान बाळांची नखं हातानेच कशी काढावीत इथपासून ते पुस्तकांच्या संपादनापर्यंत. यात सरांसोबतची मैत्री बाजूला पडते की काय असं वाटत होतं, पण तसं घडलं नाही. घरी दोघांना एकत्र भेटलं तरी ती दोघं एकमेकांना जाणीवपूर्वक स्पेस देत आणि दोघांसोबतही गप्पा होत. सरांचा आणि बाईंचा वाढदिवस एकाच दिवशी असे. त्यामुळे त्या दिवशी मी अगदी पहाटेची लोकल पकडून आधी त्यांच्या घरी जाई आणि मग वेळे ऑफिसला पोहोचे. एका वाढदिवसाची गंमत आठवते. सरांना त्यांच्या एका विद्यार्थिनीचा फोन आला. अमक्या कॉलेजातली, तमक्या बॅचची असं ती सांगत होती, पण सरांना काही आठवतच नव्हतं. ते त्यामुळे प्रचंड अस्वस्थ होऊन गेले आहेत हे बोलण्यावरून कळत होतं. ती सरांनी शिकवलेल्या कवितांचे संदर्भ देत होती, ते कसे आवडत इत्यादी सांगत होती हा घोळ पाच-सात मिनिटं चालला होता. मग सर एकदम मोठ्यानं हसले आणि आम्हांला म्हणाले, “पाडगावकरांचा फोन आहे. मुलीचा आवाज काढून लाडिक बोलतोय फसवायला. असं कसं मला समजलं नाही. हा आगाऊपणा त्याचाच असणार हे मी एवढ्या वेळात ओळखायला हवं होतं.” मग पाडगावकर बाईंशीही बोलले. कोणताही फोन आला की दोघांचं अभिनंदन होई. नंतर सरांनी सांगितलं,”तिसराही वाढदिवस आजच असला असता, थोडक्या वेळाने हुकला. ” सरांचा आणि बाईंचा वाढदिवस पंधरा जूनला आणि सरांच्या आईचा चौदा जूनला होता.
सर कट्टर मातृभक्त. आई अंथरुणाला खिळली तेव्हा तिला खाऊ घालणं, तिची अधूनमधून कूस बदलणं, एनिमा देणं, तिला उचलून घेऊन घरात जरा जागाबदल करून लहान बाळासारखं नेऊन ठेवणं अशी सगळी कामं आता आपल्यालाही म्हातारपण आलंय हे विसरून जाऊन ते करीत असत. कधी नुसते शांतपणे दोन-तीन तास बसून राहत. त्यात ‘वेळ वाया घालवतोय’ अशी भावना कधीच नसे. मुळात सरांच्या जगण्यालाच एक संथ लय होती. घाई, गडबड, गती त्यांच्या चालण्याबोलण्यात, लिहिण्यावागण्यात कुठेच नव्हती. सुबकतेचा अमाप सोस होता आणि पर्फेक्शनचा इतरांना वैताग आणेल इतका अट्टहास. स्वयंपाकघरात अमुक तवाच वापरला पाहिजे इथपासून त्यांचे कटाक्ष. बाई कधीकधी वैतागून जात. पण फोडणी कशी करावी याविषयी सांगावं तर ते सरांनीच.
एकदा मी ऑफिसमधून निघाले आणि चर्चगेटला पोहोचल्यावर ट्रेनचा गोंधळ असल्याचे समजले. भाईदरला ट्रॅक पेटवून देण्यात आले होते, दंगल उसळली होती, ट्रेन बोरिवलीपर्यंत जात होत्या आणि त्यांनाही अमाप गर्दी होती. तरी पाळणाघरात ठेवलेल्या मुलीच्या ओढीपायी मी जायचं ठरवलं. बोरिवलीहून पुढे कसं जायचं हे नंतर बघू म्हणत स्लो लेडीज स्पेशलमध्ये चढायचा प्रयत्न केला. पुढच्या बाईची उडी चुकली, तिच्यामुळे माझीही आणि आम्ही दोघीही पडलो. मी तेव्हा हाडांचा सापळा, जेमतेम सदतीस वजन असे. बाकीच्या बायका माझ्या पाठीवर पाय देऊन गाडीत चढल्या. मग कुणीतरी मदत केली आणि उठवून गाडीत नेलं. पाठीत चपलांच्या हिल्स रुतलेल्या आणि पडल्याने गुडघे फुटलेले, अजूनही लागलं असावं. वेदना काही मिनिटांत वाढल्या. अखेर मी माटुंग्याला उतरले आणि सरांच्या घरी गेले. बाई अजून ऑफिसातून घरी पोहोचल्या नव्हत्या. सरांनी हालत पाहिली आणि औषधोपचार केले. पाय आणि कंबर लचकले होते. मग अ‍ॅक्युप्रेशरचे पॉइंट्स माहीत असल्याने तोही प्रयोग करून उपचार केले. चहा बनवून दिला. मग चिवडा खाशील का? असं विचारून स्वयंपाकघरात गेले. डब्यातून चिवडा काढायला इतका का वेळ लागतोय म्हणून विचारलं, तर त्यांनी विकत आणलेल्या चिवड्याला अजून एकदा ‘चांगली सणसणीत’ फोडणी घालून तो गरम करण्याचा उद्योग केला होता. मुलगा परदेशी गेल्यावर त्याला ‘स्वयंपाकाच्या सूचना’ देणारं एक पत्र सरांनी लिहिलं होतं, ते पुढे अनेकांना उपयुक्त ठरेल म्हणून ‘लोकप्रभा’मध्ये प्रकाशितही केलं होतं. त्याविषयी त्यांनी सांगितलं. मी रात्री तिथंच थांबले आणि दुसर्‍या दिवशी बाईंचंच साडी-ब्लाऊज घालून बाईंसोबतच ऑफिसला गेले. रात्री बाई आणि सर तीनचार वेळा उठून मला ताप चढलाय का, वेदना वाढल्यात का, असं पाहून जात होते.
दोघांच्या नात्यात काहीसं अंतर होतं, पण विसंवाद नव्हता. बाई प्रचंड महत्त्वाकांक्षी. एकेक काम योजना आखून पूर्णत्वास नेणार्‍या आणि सर संयमी, शांत, काही बाबतीच थंडच म्हणावेत असे. कवितांची पुढची पुस्तकं केली नाही, बालगीतांची पुस्तकं केली नाही. त्यांचं एक बालगीत मला माझ्या एका पुस्तकात समाविष्ट करण्यासाठी विचारलं, तर सहज परवानगी देऊन टाकली; पण अखेरपर्यंत ही मुलांसाठीची पुस्तकं प्रकाशात आलीच नाही. प्रकाशकही इतके उदासीन झालेत आजकाल की सरांनी त्यांच्या उमेदीच्या काळात जशी प्रकाशक-लेखकांची नाती, संवाद अनुभवले त्याचे अंशही आज राहिलेले नाहीत. व्यवहारी बनलंय सगळं म्हणावं, तर व्यवहारापुरते संवादही नीट होत नाहीत. बाईंची शेवटची पुस्तकंही अशीच अप्रकाशित राहिली आणि सरांचीही. सरांची आई वारली आणि त्यानंतर घरात कुणी एकानं अडकून पडण्याचं कारण राहिलं नाही. पण बाईंना कॅन्सर झाला. यानंतरच्या काळात त्या दोघांचं नातं बदलून फार सुंदर बनलं. एकदा मी घरी गेले होते तेव्हा बाई म्हणाल्या,”आम्ही दोघेच आता एकमेकांना पुरेसे असतो. इतर माणसांची गरज वाटत नाही. तू म्हणतेस तसं बाहेर फिरायला जाण्याचीही गरज वाटत नाहीये, घरातच छान वाटतं एकमेकांसोबत. आयुष्यभर बोललो नाही, इतकं आम्ही आजकाल एकमेकांशी बोलत असतो.”
बाई गेल्यानंतर सरांनी लिहिलेल्या कवितांमधूनही ही नात्याची नवी ओळख डोकावत राहिली. बाई पुण्यात जोशी हॉस्पिटलमध्ये होत्या तेव्हा तीन-चार वेळा मी जाऊन आले. कुणी राहू नका, मीच एकट्याने सगळं पाहीन, असा सरांचा अट्टहास होता. निरंजन मात्र येऊन राहिला तो सगळा दीडदोन महिन्यांचा काळ. बहुतेक पालक मुलांकडे परदेशी जाऊन राहायला कंटाळतात तसं सरांचंही झालं होतं. पण घर एकट्यानं सांभाळणं झेपतही नव्हतं. काहीकाळ स्वयंपाकाला बाई येत होती. पण सामान, भाज्या आणणं; ते टिकवणं जमेनासं झालं. वस्तू खराब झाल्या की त्यांचा जीव तुटे. मग अखेर जेवणाचा डबा लावला.
एक घटना आठवली. बाईंचं डोळ्यांचं ऑपरेशन झालं तेव्हा मी घरी थांबले होते जवळ, तेव्हा नेमकी मोलकरीण आली नाही. सकाळी मी अंथरुणापांघरुणांच्या घड्या घातल्या आणि केरसुणी शोधून घर झाडत होते. बघितलं तर सर एकेका पांघरुणाची घडी उकलून पुन्हा स्वतःच्या पद्धतीने घड्या घालत होते. मला हसू आलं आणि रागही आला. म्हटलं, “एखाद दिवस घ्यायचं ना जुळवून. थोडं वेगळं झालं काम तर काय बिघडतं? वाईट तर नव्हतं ना!”
सर ओशाळं हसून म्हणाले,”सवयीचा भाग आहे गं.”
आता अशा सवयींचा हा ‘गृहस्थ’ घर एकट्यानं कसं सांभाळत असेल, हे अवघडच वाटत होतं. पण सरांनी कधी कुरबूर तक्रार केली नाही. कधीही फोन झाला की प्रसन्न वाटत राहायचं. आमचा शेवटचा फोन झाला तेव्हा आम्ही हळद्या आणि तांबट या पक्ष्यांविषयी बोललो. त्यांचे रंग, आवाज, सवयी. मग माझ्याकडच्या माव्ह रंगाच्या कृष्णकमळाच्या फुलांविषयी बोललो. ओतूरच्या आठवणी निघाल्या. आईची आठवण निघाली. सर म्हणाले, “आईनं एकदा सांगितलं होतं… माणसांना दरवेळी शत्रूंची गरज असतेच असं नाही, काहीवेळा त्याला त्याचा देहच पुष्कळ असतो!”
यावेळी आम्ही कमी बोललो नेहमीपेक्षा. मला खोट्या उत्साहाने कृतक बोलणं नको वाटत होतं आणि जगण्यातला रसच संपला आहे अशी भावना प्रबळ होत चालली होती. कशात आनंद वाटत नव्हता आणि फारसं दु:खही वाटत नव्हतं कशाचं. बोलत होतो तरी दोघं दोन ग्रहांवर आहोत असं अंतर वाटत होतं.
मग फोन ठेवताना मी सरांना म्हटलं, “पुन्हा बोलू.”
सर म्हणाले,”होय. पुन्हा बोलू.”
कोणत्या जन्मात किंवा कोणत्या स्वप्नात पुन्हा बोलणार आहोत आता… माहीत नाही.

तोवर…


तोवर चांगला आहेस तू

जोवर विचारतोस माझे हालहवाल
कधी वेळ काढून कधी फावल्या वेळेत
जोवर देतोस तहानेला पाणी भुकेला अन्न
हाकेला ओ आणि देहाला देह
आत्मा या सगळ्यातच असतो
या बाहेर नव्हे

तोवर चांगला आहेस तू
जोवर देतोस ओठांना डंख
जुईचं शुभ्र फूल निळंगर्द होईतो
देतोस जोवर शब्दाला शब्द नजरेला नजर
जगण्याला जिवंतपणा

मरून जात नाहीस मध्येच आकस्मिक
तोवर चांगला आहेस तू
अन्यथा दुष्ट दुष्टांहून