५. कॉल ऑफ द सीज


कॉल ऑफ सीज् : चंद्रमोहन कुलकर्णी

चंद्रमोहन कुलकर्णी यांच्या या पुस्तकाच्या जाहिराती यायला लागल्या, त्यातूच एक उत्सुकता मनात तयार झाली. एका माध्यमाविषयी दुस-या माध्यमातून कसे व्यक्त होता येते, हे कुतूहल वाटण्याजोगे असतेच. गाण्यासोबत चित्र, चित्रासोबत शब्द… असे काही आले की तुलना होते, अधिक-उणे शोधले जाते, कोण श्रेष्ठ असे प्रश्न विचारले जातात.
काही चित्रकार आपल्या काय कोणत्याच चित्रांबाबत बोलणे-लिहिणे पसंत करत नाहीत. चित्रानुभव शब्दांमधून मांडणे त्यांना बिनगरजेचे वाटते किंवा अवघड तरी वाटते. त्यामुळे चित्रकलेविषयी आपल्याकडे फार मोजके लिहिले गेलेले दिसते. पुस्तके तर अगदीच हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकी कमी आहेत. त्यामुळे ‘वाट पहावी’ असे या पुस्तकाविषयी मला वाटणे स्वाभाविक होतेच… आणि चंद्रमोहन मधल्या लेखकानेही माझा भ्रमनिरास केला नाही ( चित्रकार तर करणार नाही, हे गृहीत होतेच!) आणि प्रकाशकांनीही उत्तम निर्मिती मूल्य राखून आनंदात भर घातली.
हे पुस्तक नेमके कशाचे आहे? तर हा एक रंगानुभव आहे, रेषानुभव आहे… एकुण चित्रानुभव आहे… जो शब्दांच्या साथीने व्यक्त झाला आहे. रंगवले तरी बोलावे का वाटते? बोलले तरी लिहावे का वाटते? लिहिले तरी गावे का वाटते? अशा प्रश्नांना एकच उत्तर असते : कलावंताचे आंतरिक असमाधान!
व्यक्त होऊनही काही तरी राहून गेले आहे, ही भावना एकाच चित्रावर थांबू देत नाही, तर पूर्ण चित्रमालिका करायला भाग पाडते, त्याचप्रमाणे त्याविषयी शब्दांमधून सांगा-लिहायला भाग पाडते.
चित्रकार चित्र काढतो म्हणजे नेमके काय करतो? त्याला काय व्यक्त करायचे असते? रंगरेषांची भाषा तो कशी वापरतो? चित्रासाठी अमुकएकच माध्यम निवडावे असे त्याला का वाटते. आपण जी दृष्ये रोजच पाहतो, त्यांत त्यालाच नेमके चित्र कसे ‘दिसते?’ तो ‘चित्र जगतो’ म्हणजे नेमके काय? … असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. त्याची किचकट समीक्षकी त-हांनी मिळालेली उत्तरे आपल्याला उलगडत तर नाहीतच, पण अधिकच गोंधळात पाडतात. अमूर्त चित्र असले की ‘ते काय आहे? त्यात काय आणि कसे पाहायचे?’ असे वाटते. बाकीच्या चित्रांमध्ये ‘थोडेतरी काही कळतेय’ असे वाटते, पण मिनिटभर चित्रासमोर थांबून पुढे सरकले जाते. ‘काय आणि कसे बघायचे’ हे माहीतच नसते.
अशा ‘रसिकां’साठी चंद्रमोहनचे हे पुस्तक नक्कीच पाहण्या-वाचण्यासारखे आहे. त्यातील लेखन रेषेसारखेच मोकळे आणि स्वैर आहे. त्याला थोडा ‘डायरी’चा फॉर्म आहे. ते ‘आतले’ आहे, पण ‘खासगी’ नाही.
उदा.
झेपेल का एवढा यलो आपल्याला?
वरच्या प्लॅस्टिकच्या निळ्यानं त्या यलोला दाबलं तर?
यलोचा शांततेवर उजेड फेकावा?
की त्या यलोनंच शांतता गडद करावी?
चित्रकाराच्या समुद्रकिनार्‍यावरील प्रवासासोबत त्याच्या ‘नजरेचा प्रवास’ आपल्या कॅमेरा फिरवावा तसे फिरवत नेतो.
रंग, रूप, स्पर्श, वास, चव, आवाज… सारे टिपले जाते. बघता बघता सारा किनारा, सारा समुद्र, सारे आकाश जिवंत होते. निर्जीव वस्तूंनाही कंठ फुटतो. एखादा बारका ठिपका, लहानगी रेष देखील ‘माझ्याकडे पहा’ म्हणून खुणावू लागते. आणि भान हरपून आपण स्वतःची नजर विसरून चित्रकाराच्या नजरेने ते जग आसुसून पंचेंद्रियांनी अनुभवण्यासाठी उत्सुक होऊन जातो.
काही नुसती रेखाटने आहेत, रंगहीन; तर काही अ‍ॅक्रेलीक रंगांनी रंगवलेली. एरवी हे रंग मला फार भडक, बटबटीत वाटत आले आहेत. पण इथे बहुतांश चित्रांत ते जलरंग वा तैलरंगासारखे सौम्य आणि तेजस्वी होऊन येतात. हवे तिथी प्रवाही, हवे तिथे दाटलेले. जिथे ते भडक आहेत, असे वाटते, तिथे काही क्षणातच ध्यानात येते की अरे, हे तर प्लास्टीकच आहे किंवा सिंथेटिक जाळे. मग इथे त्या भडकपणाला पर्यायच नाही.
लिहिताना रंगांची नावं कधी परिभाषिक, तर कधी दैनंदिन वापरातली! “असं का?” म्हणून विचारलं, तर चंद्रमोहनचं उत्तर खास…”जे शब्द रोज जसे वापरतो, तसेच लिहिलेत.” हा पारदर्शक खरेपणा सहजतेने पूर्ण लेखनात दिसतो. लय शब्दांनाही आपसूक येते. भाषा लवचिकपणे वाकते, वळते, तुटते, थबकते. शब्दमांडणीतही असे कवितेसारखे चढउतार दिसत राहतात.
उदा.
पा णी ज रा सं ह ल तं
माणसं, त्यांच्या हालचाली, पाणी, तरीची डुचमळती लय, सार्‍या चित्राला ‘अवघड’ करून त्याचा तोल सांभाळणारी बांबूची यलो-ब्राउन-सेपिया रेष… भिनत जातं सगळं.
चित्रकाराला मधून मधून बघ्या माणसांच्या, त्यांच्या कॉमेंट्सचा डिस्टर्ब होतो आणि वाचकही पुन्हा त्या कॉमेंट्समध्ये आपलेही प्रश्न आहेत की काय म्हणून दचकून स्वतःच्या मनाला तपासायला लागतो.
रंग, ब्रश, कागद, कॅनव्हास इथपासून ते संगणक आणि चित्रं याबाबतच्या विचारांपर्यंत चित्रकार पोहोचतो, तेव्हा बदलत्या जगातल्या माणसाच्या मनातली घालमेल, तगमग कळते; जी दुसर्‍या कोणत्या तरी संदर्भात आपलीही असते.
शेवटचे ‘पुन्हा’ हे प्रकरण तर कवितेसारखे अफलातून जुळलेले. शब्द बघावेत की रंग वाचावेत, असा सगळा क्रियापदांपासून गोंधळ होऊन जातो. कितीदाही पाहिले-वाचले तरी नवे दिसते, नवे उलगडते.
चंद्रमोहन यांनी कोकणप्रवासातील समुद्राच्या हाकांबाबत शेवटी म्हटलंय तसंच या पुस्तकाबाबतही म्हणावं वाटतं……………
कोकणात जावं. किनार्‍यावर जावं. जमिनीवर जावं.
समुद्राची हाक ऐकावी, त्याप्रमाणे वागावं.

पुन्हा एकदा समुद्राकडे जावं.

मित्रांबरोबर किंवा एकट्यानं.
पण… जावं.
चित्र काढायला किंवा न काढायला,
पण; जावं.

या पुस्तकाच्या वाटेने आपण समुद्राच्या हाका ऐकून पाहू… रंगांच्या हाका, रेषांच्या हाका, आकारांच्या हाका, शब्दांच्या हाका… हाका एका चित्रकाराच्या आवाजातल्या…!

०००

मुखपृष्ठ : चंद्रमोहन कुलकर्णी; आवृती पहिली : २००८; किंमत रु.४००/-
मनोविकास प्रकाशन; फ्लॅट नं. ३ ए, चौथा मजला, शक्ती टॉवर्स, ६७२, नारायण पेठ, नू.म.वी. समोरील गल्ली, पुणे ४११०३०. फोन : ०२०-६५२६२९५०. e-mail : manovikaspublication@gmail.com

2 thoughts on “५. कॉल ऑफ द सीज

  1. या पुस्तकाच्या वाटेने आपण समुद्राच्या हाका ऐकून पाहू… रंगांच्या हाका, रेषांच्या हाका, आकारांच्या हाका, शब्दांच्या हाका… हाका एका चित्रकाराच्या आवाजातल्या…!
    नक्कीच या वाटेने जायला हवं. मस्त लिहिलंय. 🙂

    Like

  2. चित्रं कशी बघावीत हे माझ्यासारख्या शब्दवेड्या नवख्या प्रेक्षकाला दिशादर्शक! झक्कास!

    Like

Leave a comment